रिफायनरी बाबत वास्तव समजावून सांगण्यासाठी गावागावात संवाद साधण्याची तयारी सुरू.- जिल्हाधिकारी देवेंदर सिंह.
राजापूर :- प्रतिनिधी.
रिफायनरी संबंधित वास्तव काय आहे, रिफायनरी संबंधित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याविषयक कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत हे ग्रामस्थानी समजून घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी आपल्या शंका आणि प्रश्न विचारून त्याबाबतची माहिती ताजण्या कडून समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधण्यास तयार असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी दिली. यावेळी त्यानी सद्या माती परीक्षण सुरु असून त्यानंतर प्रकल्पाबाबत निर्णय होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
रिफायनरी प्रकल्पासंबंधित प्रशासनाकडून लोकांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला असून त्याप्रमाणे आज बारसु आणि धोपेश्वर येथील लोकांशी प्रांत कार्यालयात संवाद साधण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी, एम आय डी सी च्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाले, अप्पर पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी सद्या सुरु असलेल्या माती परीक्षणाबाबत माहिती दिली. या प्रकल्पबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती दिली जाणार असून त्यासाठी कोणत्या गावामध्ये कधी यावं याची गावाकऱ्यांनी माहिती द्यावी त्याठिकाणी प्रशासन येईल असे श्री सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. गावाकऱ्यांना गाव विकासासह तालुका, जिल्हा, राज्य आणि देशासाठी या प्रकल्पाचा किती आणि काय फायदा होणार आहे याचा प्राधान्याने विचार करावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले. आर आर पी सी एल कंपनीकडूनही प्रकल्पविषयी सविस्तर माहिती देवून ग्रामस्थ्यांच्या शंका सोडविल्या जातील असेही त्यांनी सांगितले. सरपंच, उपरसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा देशातील रिफायनरी अभ्यास दौराही भविष्यात आयोजित करण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुळकर्णी यांनीही सविस्तर माहिती दिली. तर, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी आंदोलक ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगताना पोलिसांनी ग्रामस्थांना कशाप्रकारे सहकार्य केले याची सविस्तर माहीती दिली. एम आय डी सी च्या अधिकारी श्रीमती खरमाले यांनीही प्रकल्पाविषयी लोकांना सविस्तर माहिती दिली जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सुनील भणसारी, श्री नांदलस्कर, इरफान चौगुले आदी ग्रामस्थानी भाग घेत प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध मुद्यान्वये चर्चा केली.