🛑तुमचे मंत्री किदें करतात ?उपचारासाठी घेऊन गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा विचारला सवाल.
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
”तुमचे मंत्री किदें करता ?” असा सवाल गोवा- बांबोळीत सिंधुदुर्गवासीयांना विचारला गेलाय. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून अपघातग्रस्त रूग्ण उपचारासाठी घेऊन गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा सवाल विचारला गेला. महाराष्ट्रातलेच रूग्ण जास्त झालेत असंही बोललं गेलं. हतबल झालेल्या जिल्हावासियांना हे गपगुमान ऐकून घेण्यापलिकडे दुसरा पर्यायही उरला नव्हता. कोल्हापुरातील पर्यटकांचा माडखोल येथे दुचाकीवरचा ताबा सुटून अपघात झाला. शिवम सावंत व सुशांत कदम या युवकांनी जखमी झालेल्या हर्षवर्धन दळवी (वय 23 गडहिंग्लज) याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचार होणार नसल्याने त्याला रेफरल टू बांबोळी सांगण्यात आलं. १०८ शी संपर्क केला असता ती रूग्णसेवेत व्यस्त होती. जवळपास तासभर वाट पहावी लागणार होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांची रूग्णवाहीका घेऊन अपघात जखमी झालेल्या रुग्णासह गोवा बांबोळी गाठली. जीएमसीत या रूग्णाला दाखल करून घेत उपचारही सुरू केले. मात्र, यावेळी येथील एकानं सिंधुदुर्गवासीय असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सवाल केला. तो सवाल होता, ”तुमचे मंत्री किदें करता ?”
उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीही वेगळी नाही. जिल्ह्यातून एक दिवस रूग्णवाहीका गोव्याला गेली नाही असं चित्र नाही. अपघात झाला रेफरल टू जीएमसी, साप चावला, विषबाधा झाली रेफरल टू जीएमसी, युरोलॉजीस्ट, फिजीशीयन नाही. रेफरल टू जीएमसी. बहुतांश, रेफरल टू जीएमसी अन् गोवा बांबोळी वारी हे गणित ठरलेलंच. आता हे सरकारी रुग्णालय शवविच्छेदनासाठी तरी उपयुक्त ठरेल तर त्यातही नशिबी हेळसांडच. त्यामुळे तुमचे मंत्री काय करतात ? सगळे रूग्ण महाराष्ट्राचे म्हणणाऱ्यांचा दोषही नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सीटी स्कॅन, एमआरआय मशीन दिल्या सुविधा पुरवल्या. आज त्याची चांगली सेवाही मिळत आहे. मात्र, रिक्त पद, तज्ञ डॉक्टरांची कमतरता अन् रूग्ण सेवेत उपचारांचा अभाव हे चित्र काही बदलेल नाही.
नव्या सरकारमध्ये पहिल्याच अधिवेशनात शिवसेना आमदार डॉ. निलेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमक्ष सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेच पोस्टमार्टम केलं. गोरगरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आणि तत्पर आरोग्यसेवा जिल्हा रुग्णालय व इतर विभागांच्या माध्यमातून मिळावी यासाठी पोटतिडकीने निलेश राणेंनी सभागृह गाजवल. रिक्त पदांची संख्या 130 डॉक्टर अपेक्षित असताना 30 डॉक्टर कार्यरत आहेत. 400 नर्स पैकी केवळ 34 नर्स कार्यरत, क्लरीकल स्टाफ 108 पैकी 6 अशी अनेक उदाहरणे समोर ठेवत राणेंनी शासनाला जाब विचारला. तदनंतर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह बैठक झाली. सुविधा देण्याचे त्यांनी मान्य केलं. मात्र, अद्यापही गोवा बांबोळी वारी काही थांबलेली नाही. मागच्या १५ वर्षात हे चित्र जैसे थेच आहे.
”तुमचे मंत्री किदें करता ?” हे आजवर किती जणांना विचारल गेलं असेल अन् ते गपगुमान ऐकून घेतल असेल हे सांगण मुश्किल आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा विचार करता सावंतवाडीकर जनतेनं दीपक केसरकर यांना चौथ्यांदा निवडून दिलं आहे. त्यामुळे आमदार केसरकर, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग सक्षम व्हावा, सरकारी रुग्णालय गोव्यावर अवलंबून राहता नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण एकच, पुन्हा कुणाची ”तुमचे मंत्री किदें करता?” विचारायची हिंमत होता नये.