सर्फनाला पारपोली शेळप वसाहत मॉडेल व्हिलेज बनवू…
ना आबिटकर यांचे प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला आश्वासन…
आजरा – प्रतिनिधी.
सर्फनाला प्रकल्पाने विस्थापित झालेल्या पारपोली या गावची शेळप येथे नवीन वसाहत झाली आहे. शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारी राज्यातील ही पहिली वसाहत होणार असून यासाठी संपूर्ण सहभाग देण्याचे आश्वासन आज आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री ना प्रकाश आबिटकर यांनी दिले. कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सर्फनाला धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने ना आबिटकर यांची भेट घेतली.
महावितरणने ही संपूर्ण वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी नुकतीच वसाहतीत बैठक घेतली होती. या बैठकीत महावितरणने पन्नास टक्के अनुदान देण्याचे मान्य केले होते. उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारच्या योजनेतून, सीएसआर फंडातून किंवा जिल्हापरिषद नाहीतर डीपीडिसीमधून खासबाब म्हणून धरणग्रस्त वसाहतीला दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील चिंचणी वसाहतीप्रमाणे पारपोली वसाहत निसर्गपुरक पर्यावरणासाठी एक मॉडेल व्हिलेज म्हणून बनविण्यासाठी आपण विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, मयुरेश देसाई, जावेद पठाण हे उपस्थित होते.