छत्रपतींना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज – महेश धानके.
शहापुर (एस. एल. गुडेकर )
रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकृत करणे हीच खरी शिवजयंती असून त्यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज असून छत्रपती शिवरायांचा बहुजन कल्याणाचा इतिहास समोर येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिव व्याख्याते तथा माजी उपसभापती महेश धानके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. मूगाव येथील समता विद्यालतात आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्ताने प्रमुख व्याख्याते म्हणून महेश धानके यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करून आपण त्यांच्या त्याग आणि संघर्षाचा अपमान करत होतो ते असामान्य महापुरुष होते,ते सर्वांचे राजे असल्याने त्यांना जातीत व धर्मात बंदिस्त करू नये,त्यांनी कुठल्याही जातीचा व धर्माचा द्वेष केला नाही तसेच त्या काळचे त्यांचे युद्ध हे धार्मिक नव्हे तर राजकीय होते म्हणूनच त्यांच्या सोबत अनेक मुस्लिम सैनिक व सरदार होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अन्वर मिर्जा होते यावेळी विद्यार्थ्यांनी शिवगीते व भाषणे सादर केली.कार्यक्रमास उपमुख्याध्यापक बांगर सर,विशे सर,माने सर,शिंदे सर,तेलुरे सर,श्रीमती तळेले,श्रीमती घनघाव,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश भोईर,सिद्धार्थ धानके उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले.