स्मार्ट – प्रीपेड मीटरच्या विरोधात ६ जानेवारीला गडहिंग्लज महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा…( वीज ग्राहक संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय.)
गडहिंग्लज – प्रतिनिधी.
राज्य शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याविरोधात महावितरणच्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू द्यायचे नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला. सुरवातीला निमंत्रक कॉ संपत देसाई यांनी बैठक बोलवण्यामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले की आज आपण शांत राहिलो तर अदानी संपूर्ण महावितरण कंपनी आपल्या घशात घालील. सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु होईल. जनतेच्या पैशातून उभा राहिलेले इन्फ्रास्ट्रक्टर आपल्या ताब्यात घेईल. हे थांबवायचं असेल तर जनआंदोलन उभा करावं लागेल. आज सत्तेवर असलेलं सरकार हे अदानीचे बटीक आहे त्याना सरळ करायचे असेल तर जन आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही.
बैठकीच्या अध्यक्षस्थनावरून बोलताना प्रा सुनील शिंत्रे म्हणाले की आज अदानीची चाल वेळीच ओळखून त्याला पायबंद घालावा लागेल. गावागावात जाऊन जागृती करून आंदोलन व्यापक करावे लागेल. त्याची आखणी करून आजपासून कामाला लागूया. विद्याधर गुरबे यांनी सांगितले की यापूर्वी बंटी उर्फ सतेज पाटील यांनी याविरोधात आवाज उठवला होता. आपण जन आंदोलन उभा करू
बाळेश नाईक म्हणाले की आपण जनतेला संघटित करून अदानीचा डावपेच हाणून पाडूया
अमर चव्हाण म्हणाले की सोलर पॅनेलची सक्ती करून शेतकऱ्यांना साडे सात हॉर्स पॉवरचे कनेक्शन नाकारले जात आहे. ते तातडीने थांबले पाहिजे. नागेश चौधरी यांनी सांगितले की जबरदस्ती करायचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडू. यावेळी श्रीमती अंजना रेडकर, दिलीप नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी खालील तीन विषयांना घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे
चौकट.
१- महारष्ट्र शासनाने महावितरणच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध असून आजरा तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाला हे मीटर न देणे बाबत
२- अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेत प्रत प्रत्येक गावचावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घेऊन जनतेचे मत जाणून घेणे बाबत…….
३- साडे सात हॉर्स पॉवरच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना सोलर सिस्टीमची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारले जात ते तात्काळ थांबवून सर्व मागणीदारांना कनेक्शन तातडीने देणे.
यावेळी कृष्णा भारतीय, प्रकाश मोरुस्कर, शिवप्रसाद तेली, डॉ रोहन जाधव, किरण पाटील, अजित बंदी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उवस्थित होते.