HomeUncategorizedनऊ महिन्यांतच कर्जभार ६७ हजार कोटींवर.- गतवर्षांच्या तुलनेत राज्याची जास्त कर्जउभारणी.🛑मुंबई कोविड...

नऊ महिन्यांतच कर्जभार ६७ हजार कोटींवर.- गतवर्षांच्या तुलनेत राज्याची जास्त कर्जउभारणी.🛑मुंबई कोविड घोटाळ्यात लाच म्हणून घेतली सोन्याची बिस्कीटे

🔴 नऊ महिन्यांतच कर्जभार ६७ हजार कोटींवर.- गतवर्षांच्या तुलनेत राज्याची जास्त कर्जउभारणी.🛑मुंबई कोविड घोटाळ्यात लाच म्हणून घेतली सोन्याची बिस्कीटे

मुंबई – प्रतिनिधी.

चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) रोखे बाजारातून २२ हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांतील कर्जाची रक्कम ६७ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत राज्यावरील कर्जभार यंदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची आकडेवारी रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केली आहे. या तिमाहीत विविध राज्यांकडून एकूण २ लाख ३७ हजार कोटींचे कर्ज रोखे बाजारातून उभे करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक कर्ज उत्तर प्रदेश (३१ हजार ५०० कोटी) घेणार असून त्याखालोखाल कर्नाटकचा (३० हजार कोटी) क्रमांक आहे. महाराष्ट्र सरकारने २२ हजार कोटी कर्ज घेण्याची मागणी रिझव्‍‌र्ह बँकेकडे नोंदविली होती. अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी हे कर्ज वापरण्यात येते. अर्थसंकल्प तयार करतानाच या कर्जाचा विचार करूनच नियोजन केले जाते.
राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये मिळून एकूण ४५ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यात तिसऱ्या तिमाहीतील २२ हजार कोटींची भर पडून कर्जभार ६७ हजार कोटींवर पोहोचला आहे. गत आर्थिक वर्षांत राज्य सरकारने एकूण ७२ हजार कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्या तुलनेत यंदा तिसऱ्या तिमाहीतच ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज राज्य सरकार उभारणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस एकूण कर्जात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षांअखेर राज्यावरील कर्जाचा बोजा सात लाख कोटींच्या वर जाण्याचा अंदाज आहे. कर्जाचा बोजा वाढला असला तरी स्थूल राज्य उत्पन्नाच्या हे प्रमाण १८.२३ टक्के आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने २५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत कर्ज घेण्यास मुभा दिल्याने राज्याचे कर्जाचे प्रमाण आटोक्यात असल्याचे उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकने गेल्या आर्थिक वर्षांत ३६ हजार कोटींचे कर्ज उभे केले होते. यंदा तिसऱ्या तिमहीअखेर ४९ हजार कोटींचे कर्ज होणार आहे. राजस्थानमधील कर्जाचे प्रमाण वाढले आहे.
राज्याला आर्थिक वर्षांत १ लाख २० हजार कोटींपर्यंत कर्ज उभारण्याची मुभा आहे. तरीही राज्य सरकार ८० हजार कोटींच्या आसपास कर्ज उभारते. कर्जाचे प्रमाण आटोक्यात आहे. राज्याची अर्थव्यवस्था आता सुस्थितीत आहे.
नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)

🔴मुंबई कोविड घोटाळ्यात लाच म्हणून घेतली सोन्याची बिस्कीटे

मुंबई – प्रतिनिधी.
मुंबईतीत कथित कोविड घोटाळ्या प्रकरणात लाच स्वरूपात चक्‍क सोन्याची बिस्किट आणि नाणे देण्यात आली आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केला आहे. जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात 32.44 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष न्यायालयाच्या न्या. एम. जी. देशपांडे यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने 15 सप्टेंबर रोजी लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार सुजीत पाटकरांसह हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जंम्बो कोविड सेंटरचे डीन यांचाही समावेश आहे. ईडीने आरोपपत्रात सांगितल्यानुसार, संजय शाह यांनी 60 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले. हे सुजित पाटकर यांच्यामार्फत महापालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरूपात देण्यात आले. तसेच, सुजित पाटकरांनी 15 लाख रुपयांची रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांना दिली.
जुलै ते डिसेंबर 2020 या दरम्यान दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांना लॅपटॉपसह 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळाल्याचेही ईडीने आरोपपत्रात सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.