विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधासाठी उद्या आजऱ्यात निदर्शने.
आजरा – प्रतिनिधी.
दिल्ली येथे जंतरमंतरवर चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाहीर निदर्शने करण्याचा निर्धार आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
जंतर-मंतर येथे गेले २० दिवस नीट पेपर फुटी प्रकरणी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी शांततामय पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आंदोलन बेदखल करण्याचा हा प्रकार आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध व जाब विचारण्यासाठी आज संसदेवर निघालेल्या मोर्चावर अमानुष पद्धतीने लाट्याला करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले आहेत. सरकारची ही कृती अमानुष असून लोकशाही विरोधी आहे. लोकशाहीमध्ये लोकांना आपला विचार मांडण्याची आणि सरकारच्या धोरणाविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्याचा अधिकार असतो पण हा अधिकारच सरकार नाकारत आहे. सरकारच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आज झालेल्या बैठकीत करण्याचे ठरले.
बैठकीला कॉम्रेड संपत देसाई, सुभाष विभुते, रावसाहेब देसाई, रवींद्र भाटले, कॉम्रेड शांताराम पाटील, कॉम्रेड दत्ता कांबळे, प्रकाश मुरुसकर, कॉम्रेड संजय तरडेकर, महादेव सुतार, पुष्पलता घोळसे, प्रा मीना मंगळूरकर, काशिनाथ मोरे, संजय घाडगे, व्ही डी जाधव, दशरथ घुरे, भीमराव माधव, शिवाजी गुरव, संजयभाई पवार, निवृत्ती गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
