🛑 बालमृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी. – आरदाळ महिलेचा आंदोलनाचा इशारा 🛑 ठाकरे गटाची चाल यशस्वी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द.. 🔴२००० हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली.🛑आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 🛑 आजरा अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील आरदाळ येथे गरोदर महिलेला २४ तास ताटकळत ठेवणाऱ्या व बालमृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन शशिकांत आनंदा कांबळे व शिवाजी गुरव (सामाजिक कार्यकर्ता) राहणार-आरदाळ, तालुका- आजरा यांनी निवेदनाने आंदोलनाचा इशारा दिला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बालमृत्यूस कारणीभूत असलेल्याचे वर कार्यवाही व्हावी. यासाठी दि. ४ रोजी आंदोलन करत असले बाबत आरदाळ गावातील महिला अश्विनी शशिकांत कांबळे यांना दि. १९ रोजी बाळंतपणासाठी १०८ च्या सरकारी गाडीतून उत्तुर पी.एच. सी मध्ये दाखल केले. त्यांनी रेफर करत उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पाठवले. त्या ठिकाणी त्यांना उंची कमी असल्याचे कारण देत व त्यांचा रक्तगट ए निगेटिव्ह असून हे ब्लड मिळत नसल्याने सी.पी.आर हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरला जाण्याचा सल्ला दिला. चारच दिवसांपूर्वी याच उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे सदर महिलेचा एच.बी नऊ असल्याचे सांगितले. तसेच कार्डात नमूद आहे असे असताना त्यांना सिजर करताना दोन बॉटल रक्त लागेल. असे येथील डॉक्टर तेजस्विनी चव्हाण यांनी सांगितले रक्त दोन बॉटल बाहेरून मिळत असून इथेच डिलिव्हरी करण्याची नातेवाईक विनंती करत होते. मात्र या डॉक्टरांनी लगेच तीन बॉटल लागतील असे सांगितले. एकंदरीत त्या दिवशी गणपती येण्याचा सणाचा दिवस असल्याने त्यांना आपले कर्तव्य करणे टाळाटाळ करायची होती. तेथील रेफर चिठ्ठी त्यास डॉक्टरने दिली. व गाडीतून जाताना कदाचित गाडीत डिलिव्हरी होईल त्यामुळे एका कुशीवर झोपून जाण्याचा चुकीचा सल्ला दिला असे सल्ला ऐकणाऱ्या नातेवाईक महिला सांगत आहेत हा सल्ला चुकीचा दिला असल्याचे तज्ञ महिलांचे मत आहे. एका कुशीवर झोपून जाणे त्यानंतर सीपीआर मध्ये दाखल झाल्यावर तेथील डॉक्टर आणि डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे. गडबड करू नका असे म्हणत पूर्ण रात्र घालवली व दुसऱ्या दिवशी दि.२० रोजी सकाळी ९ नंतर बाळाचे ठोके कमी जास्त होणे असे चालू झाल्यानंतर मग त्यांची पळापळ सुरू झाली व सिजर करण्यात आले. रात्रभर नातेवाईक सिजर करण्यासाठी विनंती करत होते त्यांचे सी.पी.आर मधील कर्मचारी डॉक्टर यांनी न ऐकता आपला हट्टीपणा केला व तेथे सांगण्यात आले डिलिव्हरी ला फार उशीर झाल्याने बाळ थोडे गुदमरले आहे त्याला काचेत ठेवावे लागेल व काचेत ठेवण्यात आले.
तसेच ‘रक्तगट- ए पॉझिटिव्ह’ असताना ‘ए निगेटिव्ह’ कसे सांगता? एकूण यंत्रणामध्ये समन्वय नाही कारण माता आणि बालक संरक्षण कार्ड मध्ये नोंद रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे व लॅब चा रिपोर्टवर ए निगेटिव्ह असे आहे प्रत्यक्ष रक्त बॉटल लागलीच नाही. यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे एका गरीब दलित महिलेच्या बाळाचा हकनाक बळी गेला आहे या बालमृत्यूची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून जबाबदार डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. बाळाला डायलिसिस करावी लागेल असे सांगून औषध व साहित्यासाठी हजारो रुपये खर्च करावयास या यंत्रणेने लावले आहे. शेवटी बाळाचा चार दिवसानंतर मृत्यू झाला बाळ सशक्त अडीच किलोचे होते या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी व कार्यवाही व्हावी यासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दि. ४ रोजी आंदोलन करत आहोत याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
अर्जासोबत पुरावे जोडले आहेत.
माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रत:-
१) मा.अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग गोते रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई 400001. २)मा.जिल्हा सिव्हिल सर्जन,सी.पी.आर हॉस्पीटल कोल्हापूर. ३)मा.उपविभागीय अधिकारी सो, गडहिंग्लज. ४)मा.पोलिस.नि.सो गडहिंग्लज. यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.
🛑ठाकरे गटाची चाल यशस्वी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द..
मुंबई.- प्रतिनिधी.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नियोजित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस लावणार राहुल नार्वेकर हजेरी लावणार होते.
पण आता अचानक हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय. हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. पण याच दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंबंधित सुनावणी होणार होती.
आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता राहुल नार्वेकरांनी आपला परदेश दौरा रद्द केला की काय अशी चर्चा सुरू आहे.
नार्वेकरांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून ॲफिडेव्हिट.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या संबंधित वेळापत्रक सादर करावं असंही सांगितलं होतं. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर केलं. पण त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तसेच राहुल नार्वेकरांच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट सादर केलं आहे.
आदित्य ठाकरेंची बोचरी टीका.
राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा जाहीर झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राहुल नार्वेकर हे राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भेट देणार आहेत, परंतु ते कोणत्या आधारावर अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतील जिथे घटनाबाह्य, असंवैधानिक सरकार आहे आणि ज्याला बेकायदेशीर मार्गांनी संरक्षणही दिलं जातंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता.
🔴२००० हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली.🛑आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मुंबई :- प्रतिनिधी.

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवली आहे.उद्या रविवारपासून २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी ७ दिवसांची मुदत मिळाली आहे.
२००० हजारांच्या नोटा जमा करण्याची अखेरची तारीख ३० सप्टेंबर होती,परंतू ती आता एक आठवड्याने वाढविण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० हजारांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली होती. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. चलनात असलेल्या ९३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे सांगितले जात आहे.
आरबीआयने आता ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी उरलेल्या २४ हजार कोटी रुपयांपैकी किती नोटा परत येतात हा एक प्रश्नच आहे. शेवटचा आकडा ७ ऑक्टोबरनंतर समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर उरलेल्या हजारो करोडोंच्या नोटांचा काय झाले हा देखील मोठा प्रश्न यंत्रणांसमोर राहणार आहे.
🛑 आजरा अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार.

आजरा. – प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. यांचे मार्फत जिल्हास्तरीय बँकींग परिषदेच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आजरा अर्बन बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये रु.५०१ कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेस दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला या प्रसंगी बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपाडेसो, व्हा. चेअरमन श्री रमेश कुरुणकरसो, संचालक श्री. विलास नाईकसो, श्री. सुनील मगदुमसो, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशात गंभीरसो व असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष निपुणराव कोरेसो, उपाध्यक्ष श्री. महेश धर्माधिकारीसो उपस्थित होते. आजरा तालुक्यामध्ये ६३ वर्षापूर्वी बँकेचा कार्यविस्तार सुरू झाला. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु. १३५० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. IMPS NEFT/RTGS POS, E-Commerce आदी सुविधानी बँक सुसज्ज आहे. Google Pay. PhonePe, Paytm, QR Code या सुविधा बँकेकडे उपलब्ध असून केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP कर्ज योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना यासारख्या कर्ज योजना बँकेकडे सुरू आहेत.
ग्रामीण भागातील कारागिरांसाठी विनातारण पंतप्रधान विश्वकर्मा कर्ज योजना, जेष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा देण्यासाठी Helpline, WhatsApp द्वारे बैंकिंग या सारख्या सुविधा बँक लवकरच सुरू करीत आहे. बैंक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्हयात व कर्नाटक राज्यातील बेळगावी व उत्तर कन्नड जिल्हयात एकूण ३२ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे. भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस असून वरील सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधनेचे आवाहन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यानी केले.
