शिंदे, सत्तारांनंतर आता शंभूराज देसाईंचा नंबर. –
महाबळेश्वरमधील ते प्रकरण येणार अंगलट ?
नागपूर :- प्रतिनिधी.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीत सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.त्यातच महाविकास आघाडीने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या वर आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला होता. गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन आता विरोधी पक्षाकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत. या मुळे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील एनआयटीच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोप, त्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अन्न-औषध मंत्री संजय राठोड, यांच्यावरील आरोपांनंतर आता उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि उद्योगमंत्री उदय सामंत महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. शंभूराज देसाई यांनी विना परवानगी बांधकाम केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनाच्या बाहेर सामंत, सत्तार, राठोड आणि शंभूराज देसाई यांच्या नावाने घोषणाबाजी केली.शंभूराज देसाई यांनी विना परवानगी बांधकाम केलं असून त्यांच्या या बांधकामाचा उल्लेख सातबारावर नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. देसाई यांनी महाबळेश्वरमधील नावली इथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. यामुळे शंभूराज देसाईंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.इतकेच नव्हे तर, देसाई यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात या जमिनीचा शेत जमीन म्हणून उल्लेख केला. पण प्रत्यक्षात या जमिनीवर निवासी बांधकाम केलं आहे. सातबारावर या घराच्या बांधकामाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. सदर जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामाला परवानगी नव्हती. त्यामुळे परवानगी न घेता घराचं अवैध बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द होण्यास पात्र आहेत, विशेष म्हणजे जमीन ही शंभूराज देसाई यांच्याच नावावर आहे, असेही आरोप महाविकास आघाडी करुन करण्यात आले आहे.
शंभूराज देसाई यांनी आपल्या पाटण येथील शेतजमिनीवर बांधकाम केलं आहे. पण सातबारावर या बांधकामाचा कुठेही उल्लेख नाही. देसाई यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे. तसेच यासंबंधी जी पुरावे आणि आवश्यक कागदपत्र आहेत, ती विधिमंडळात ठेवण्याचा इशाराही ठाकरे गटाच्या आमदारांनी दिला आहे. आता या आरोपांना देसाई काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.