सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ
मुंबई. – प्रतिनिधी.

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत आज शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी काल गुरुवारी दिली.
यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नागरिकांमधून सरपंचांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली असून, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली.त्यानुसार, असलेली सरसकट २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे.
सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठीही खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदस्य आणि सरपंच ही पदे सर्व प्रभागांकरीता सामायिक असून प्रत्येक प्रभागातून या सामाईक पदासाठी मतदान होणार आहे.याचा विचार करता सरपंचपदाच्या उमेदवारास ग्रामपंचायतींच्या सर्व प्रभागांमध्ये प्रचारासाठी संपर्क करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग संख्येच्या प्रमाणात सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्यनिहाय खर्चाची मर्यादा (रुपयांमध्ये)
७ ते ९ : २५,०००
११ ते १३ : ३५,०००
१५ ते १७ : ५०,०००
👉सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी.
७ ते ९ : ५०,०००
११ ते १३ : १,००,०००
१५ ते १७ : १,७५,०००