शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाला तीव्र विरोध करणार. – निवडणुकी नंतर आंदोलन तीव्र करण्याचा शाळा बचाव आंदोलनाचा निर्धार.
आजरा – प्रतिनिधी.

सुधारित संचमान्यतेमुळे हजारो शिक्षकांची पदे रिक्त होणार असून त्यामुळे खेड्यापाड्यातील हजारो शाळा बंद पडणार आहेत. या विरोधात जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा शाळा बचाव आंदोलनाचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी दिला.
तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने वीस पटाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आजरा तालुक्यातील शिक्षक, पालकांनी व शाळा व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरापर्यंत आजरा ते सावंतवाडी असा लॉंग मार्च काढला. शिक्षण हक्क यात्रा काढली. याची दखल घेत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय तात्पुरता स्थगित केला. पण गेल्या वर्षी पुन्हा 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा अन्याय शासन निर्णय करून आता ती संच मान्यता अंतिम करण्याचा विचार सरकार करत आहे. यातून हजारो शाळा बंद पडणार आहेत आत्ता सेवेत असलेले अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत म्हणूनच या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
आजरा येथे मागच्याच महिन्यात झालेल्या बैठकीत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या 20 तारखेला हरकती नोंदणीबद्दल राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. 25 फेब्रुवारी अखेर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. 3 मार्च रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. यामुळे खेड्यापाड्यातील, छोट्या गावातील शाळा, हायस्कूल बंद पडणार आहेत. त्यामुळे आम्ही या विरोधात पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि आणि सजग नागरिक एकत्र येत शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत. जिल्हा परिषद निवडणूक संपली की तातडीने याची जिल्हाव्यापी बैठक बोलून आंदोलन पुढील दिशा जाहीर करण्यात येणार आहे. असे पत्रक शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने काढण्यात आले आहे. पत्रकावर कॉम्रेड संपत देसाई, कृष्णा भारती, कॉम्रेड सम्राट मोरे, संजय तरडेकर, युवराज पवार, शिवाजी गुरव, दशरथ घुरे, सुभाष निकम, डी के बोडके, नजीर चौगुले, जगनाथ कुडतुडकर इत्यादींच्या सह्या आहेत.
