मेघोली – बांद्राई धनगर वाड्यावरील कारवाईचा निषेध. ( कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी)
आजरा .- प्रतिनिधी.
चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा व भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा येथील गरीब धनगर कुटुंबावर त्यांची शेती घरे नासधूस करून ऐन पावसाळ्यात त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम वन खात्याने केले आहे. वन खात्याच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत. याबाबत आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर कारवाई कोणाच्या आदेशाने झाली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते त्यांच्यावर त्यांचे निलंबन केले पाहिजे. अशीही मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
खरंतर २००६ आणि २००८ चा वनाधिकार कायदा झाल्यानंतर पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि पारंपारिक वननिवासी ना जंगल जमीन व जंगलाचे अधिकार मिळाले आहेत. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी न करता त्यांना जंगलातूनच हद्दपार करणे त्यांचे संसार उध्वस्त करणे ही बाब कायद्याच्या विरोधात आहे. म्हणूनच या बाधित धनगर कुटुंबांना ताबडतोब न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज श्रमिक मुक्ती दल वनाधिकार संघर्ष समिती आजरा यांच्या वतीने तहसीलदार आजरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई प्रकाश मोरस्कर, संजय तरडेकर, युवराज जाधव, नामदेव भगरे, देविदास शेडगे, संतोष शेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
