३५ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक श्री चंद्रकांत दाजी घुणे यांचा सपत्नीक सत्कार.
गवसे, प्रतिनिधी.
बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथील मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे हे नियत वयोमानानुसार ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि यशस्वी शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभात जनता एज्युकेशन सोसायटी, आजराचे अध्यक्ष तथा आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या शुभहस्ते श्री. घुणे सर यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास बापूसाहेब सरदेसाई (उद्योगपती, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश अण्णा कुरुणकर, संचालक विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे सर, आय. के. पाटील सर, सल्लागार सौ. नुरजहा सोलापुरे मॅडम, आजरा तालुका शेतकरी संघाचे चेअरमन महादेव हेंबाळकर, परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मित्रमंडळी, हितचिंतक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी श्री. घुणे सर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “जीवनात काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत; त्या आपल्या विचाराने, कार्याने, सेवाभावाने आणि माणुसकीने उंचावलेल्या असतात. श्री घुणे हे त्यापैकीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.”
सन १९९२ मध्ये शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तब्बल ३५ वर्षे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा ठरला. जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा या संस्थेत त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने सेवा बजावत शाळेची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि अनेक कुटुंबांची स्वप्ने साकार झाली. समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलांसाठी त्यांनी अनेक प्रकारची मदत केली.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आपल्या मूळ गावी शेळप येथे भैरवनाथ दूध संस्थेचे संस्थापक तसेच भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे संस्थापक म्हणून ग्रामीण विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. कै. काशिनाथ अण्णा चराटी, कै. माधवरावजी देशपांडे तसेच कै. मनोहर फळणीकर यांच्यासमवेत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. तसेच आजरा ता. मुख्याध्यापक कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. गरजूंना मदतीचा हात देणे, समाजासाठी सदैव धावून जाणे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

समारोपाच्या वेळी उपस्थितांनी श्री. घुणे यांच्या कर्तृत्वपूर्ण, समाजाभिमुख आणि प्रेरणादायी सेवेला मनःपूर्वक सलाम करत त्यांच्या निरोगी, आनंदी व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एस. महाजन यांनी केले.
