🛑गोळीबारानंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक सलमानच्या घराबाहेर दाखल.
🛑व्यंकटराव हायस्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.
🛑भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३ जयंती निमित्त. जिलेबी वाटप.
मुंबई:- प्रतिनिधी.

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर रविवारी पहाटे 5 वाजता अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, लखमी गौतम आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासह मुंबई पोलिस अधिकाऱ्यांचं पथक सलमानच्या घराबाहेर पोहोचलंय.दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर तीन राऊंड फायरिंग केली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा आणखी वाढवली आहे. त्याचसोबत आरोपींचा शोध सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस सहआयुक्त (गुन्हे शाखा), लखमी गौतम आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक सलमान खानच्या घराबाहेर दिसत आहेत.
🅾️सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास मुंबई क्राइम ब्रांच करतेय. म्हणूनच एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सलमानच्या घराबाहेर पाहिलं गेलंय. दया नायक यांनी आजवर अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या नावाने केवळ छोटे-मोठे गुन्हेगारच नाही तर संपूर्ण अंडरवर्ल्ड थरथर कापतो. त्यांनी आजवर एक-दोन नाही तर 80 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सलमानच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवले आहेत. तर आरोपींना पकडण्यासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा सलमान खान त्याच्या घरी उपस्थित होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सलमानशी बातचित केली आहे.
🟣सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
🛑व्यंकटराव हायस्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. शिंपी यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाचा ध्यास आणि वाचनाचे अपार वेड असल्यामुळे बालपणातील सर्व इयत्ता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतं त्यांनी मिळविलेले ज्ञान हे कायमस्वरूपी लक्षात ठेवत अनेक पदव्या भारतात आणि भारताबाहेरील विद्यापीठातून संपादन केल्या. आपण मिळविलेल्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या अस्पृश्य समाजातील गोरगरीब जनतेला एकत्रित करून त्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण दिली. व विश्रांत परिश्रमातून सर्व जगातील संविधानांचा अभ्यास करून भारताचे एक आदर्श संविधान लिहिण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केल्याने त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माजी प्राचार्य व संचालक एस जी देसाई, पांडूरंग जाधव, अभिषेक शिंपी, सचिन शिंपी, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे. शेलार, एन.ए.मोरे, एम एम देसाई , शिवाजी पारळे, एम.ए.पाटील, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतिक विभागाने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही पाटील यांनी व आभार व्ही.एच. गवारी यांनी मानले.
🛑भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३ जयंती निमित्त. जिलेबी वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील जय भीम तरुण मंडळ आजरा यांचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३ जयंती निमित्त आजरा बस स्थानक परिसरात प्रवासी तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष यांना बिसलरी तसेच जिलेबी व बिस्किटे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे, सचिन कांबळे, सतीश सुर्वे, विशाल कांबळे, शिवाजी कांबळे, नितीन यादव, आजरा व बुरुडे मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.