🛑हसन मुश्रीफ फाउंडेशन आयोजित – ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण
🛑वाहतूक पोलीसाने गळफास घेत संपवले जीवन
🛑गुटखा वाहतूक, विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार.राज्यातील सर्वात कठोर मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई?
🛑हसन मुश्रीफ फाउंडेशन आयोजित – ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण
आजरा.- प्रतिनिधी.

उत्तूर येथे एच. पी. व्ही ( HPV ) लसीकरण. रविवार दि.२० जुलै रोजी उत्तूर येथे नाम. हसन मुश्रीफ फाउंडेशन वतीने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरणाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक अनिल कुरणे यांनी केले यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव धुरे, पंचायत समिती आजरा माजी उपसभापती शिरीष देसाई प्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र गुरव यांनी HPV लसीकरणाविषयी माहिती दिली.
तसेच ९ ते २६ वयोगटातील सर्व मुलींनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तुर यांच्यामार्फत HPV लसीकरण करण्यात आले. आज रोजी शाळेतील ४८ मुलींना आणि २ शाळाबाह्य अशा एकूण ५० मुलींना HPV लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रा. आ. केंद्रा कडील सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, कन्या व कुमार शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भांडकोळी यांनी केले.

🟥पुण्यात वाहतूक पोलीसाने गळफास घेत संपवले जीवन
पुणे :- प्रतिनिधी

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार असलेल्या राजेंद्र गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे शहरातील वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील कॉलेज मागे, धानोरी, लोहगाव) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजेंद्र गायकवाड हे सध्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी त्यांची साप्ताहिक रजा असल्याने ते घरीच होते. त्यांच्या पत्नी दौंड येथे गेलेल्या होत्या, तर १२ आणि १४ वर्षांचे दोन मुलं शाळेत गेले होते.
पत्नी फोन करत असतानाही राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी मुले शाळेतून परत आल्यानंतर घराचे दार बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर गायकवाड यांनी घरातच गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🟥गुटखा वाहतूक, विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार.राज्यातील सर्वात कठोर मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई?
मुंबई :- प्रतिनिधी
राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना गुटखा खाल्ल्याने कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी केली. त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखा व पान मसालाजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल का? याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, असे स्पष्ट केले.
आमदार श्रीकांत भारतीय यांनी राज्यात गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी. राज्यात सर्रास गुटखा विक्री होते. गुटखा बंदीची अंमलबजावणी होत नाही. ग्रामीण भागातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण गुटखा सेवन करणारे असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. सरकारने अत्यंत गंभीरपणे या बाबत कारवाई करण्याची मागणी केली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतली.
सध्याच्या कायद्यानुसार गुटखा वाहतूक, विक्री करणाऱ्याला एका वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. २०१२ पासून त्याच कायद्याच्या आधारे कारवाई केली जाते. मात्र, आता बदल करण्याची वेळ आली आहे. राज्यात गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी गुटखा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचा विचार आहे. राज्यभरात आतापर्यंत ४५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि दहा हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल. गुटखा बंदी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल, असेही झिरवाळ म्हणाले.
सदस्यांनी झिरवाळ यांना धारेवर धरले. गुटखा विक्री करणाऱ्या लहान पानटपऱ्यांवर कारवाई होते. वाहन चालकांवर कारवाई होते. पण, मोठे व्यापारी, गुंड आणि गुटखा वाहतूक विक्रीला संरक्षण देणाऱ्या पोलिस आणि वाहतूक अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. पोलिस संरक्षणात गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून ट्रक भरून गुटखा राज्यात येतो, असा आरोप केला. गुटखा वाहतूक आणि विक्रीची चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी केली असता संबंधित प्रकरणाची तपासणी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही झिरवाळ यांनी जाहीर केले.