आजरा आगाराच्या कारभाराबाबत पं स. मासिक सभेत तीव्र नाराजी व्यक्त.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. दरवेळी पंचायत समिती मासिक सभेमध्ये आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील हे उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे संतप्त पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आजरा एसटी आगाराचा कारभार सुधारावा अथवा एसटी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी बदली करून घ्यावी, असे खडे बोल सुनावले. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती जयश्री गाडे होत्या. यावेळी उपसभापती यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारदे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती मासिक सभेला खाते प्रमुख उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच मागील महिन्यातील आढावा घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे पंचायत समिती सदस्यांनी निर्देश दिले.

कृषी विभागाचा आढावा मंडल कृषी अधिकारी मोहन कुळे यांनी सांगितला. काजू रोपे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. खतांची ऑनलाईन नोंदणी व विक्री चालू असल्याचे त्यांनी सांगितले. खतांच्या ऑनलाइन बाबत ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी काय उपाययोजना केली, अशी विचारणा उपसभापती यशोदा पोवार यांनी केली. एसटीचा आढावा आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी मांडला. यावेळी सर्व सदस्यांनी आजरा आगाराच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एकूण व्यवस्थापनाबद्दल ताशेरे ओढले. ग्रामीण रुग्णालयाचा आढावा डॉ. वृषाली केळकर यांनी मांडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घ्यावी असे सांगण्यात आले. वनविभागाच्या आढाव्यावेळी रस्त्यासाठी वृक्षतोड झाल्यानंतर किती वृक्ष लागवड झाली याची माहिती देण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम आढाव्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी आवंडी धनगरवाडा रस्ता शेजारी गटारी का केल्या नाहीत अशी विचारणा केली. मुमेवाडी घाटात अपघात होत आहेत त्यामुळे स्पीड ब्रेकर करण्याची मागणी सदस्य विकास चोथे यांनी केली. रोजगार हमी योजना आढाव्यावेळी योजनेची पैसे लोकांना वेळेवर मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, एकात्मिक बालविकास, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, प्रधानमंत्री आवास, बचत गट या विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
