जनता सहकारी बँकेच्या सभासदांना १०% डिव्हीडंड ( कर्मचाऱ्यांना दहा हजार पर्यंत पगार वाढ व २०% बोनस जाहीर.)
आजरा.- प्रतिनिधी.
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेच्या कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर २०२६ पासून रु. ३००० ते रु. १०००० पर्यंत अशी भरघोस पगार वाढ व सन २०२५-२६ साठी २०% बोनस देण्याची घोषणा बँकेचे चेअरमन मा. मुकुंददादा देसाई यांनी केली.
बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असून बँकेचे संचालक/ कर्मचारी यांचे प्रयत्नाने बँकेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. बँकेकडे ३० सप्टेंबर २०२६ अखेर ५०९.४९ कोटीच्या ठेवी व ३३३.२४ कोटीचे कर्जे वितरीत केले आहेत अशी भरघोस वाढ झाली आहे.
बँकेची दिवसेंदिवस नेत्रदीपक प्रगती होत असून मार्च २०२७ अखेर ५५०.०० कोटीच्या ठेवी व ३७५.०० कोटीचे कर्ज उद्दिष्ट ठेवलेले आहे. बँकेकडे ३० सप्टेंबर २०२६ अखेर ७०००० हजार खातेदार असून सभासद संख्या ३५०९९ इतकी आहे. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे ECBA (FSWM) यांचे निकष पूर्ण केले असून रु. ९०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सहाव्यांदा सन्मानित केले आहे.
बँकेने दसरा- दिवाळी सनानिमित्त कार लोन ९%, व्यावसायिक वाहन १०%, घरबांधणी कर्ज ९%, सोनेतारण १०% यासारख्या अनेक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. बँकेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेमार्फत १३७३ सभासदांना १५०.६० कोटी कर्जवाटप केलेले आहे. बँकेने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया कर्ज योजना यासारख्या योजनांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी जनरल मिटींगमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे सभासदांना १०% डिव्हीडंड व नोकरांना पगारवाढ या घोषणेची पूर्तता केलेली आहे. त्यामुळे सभासद व कर्मचारी यासह सर्व घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन अमित सामंत, जेष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, महादेव टोपले, रणजीतदादा देसाई, विक्रम देसाई, शिवाजी पाटील व अन्य संचालक तसेच बँकेचे सीईओ एम. बी. पाटील, असि. मॅनेजर पी. ए. सरंबळे, अकौंटंट एस. एच. चौगुले, वसुली अधिकारी एम. वाय. सावंत व अन्य कर्मचारी यांचे बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे.




