आजरा टोलनाक्याच्या भूमिकेबाबत पालकमंत्री नाम. श्री. आबिटकर यांनी पुढाकार घ्यावा : टोल विरोधी संघर्ष समितीची मागणी.
( पत्रकार परिषदेत समितीने उपस्थित केले प्रश्न; नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याची मागणी.)
आजरा, प्रतिनिधी.
आजरा येथील संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरील टोलनाक्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी टोल विरोधी संघर्ष समितीने दि. १२ रोजी पत्रकार परिषदेत केली आहे.
समितीने सांगितले की, टोलनाक्याच्या विरोधातील आंदोलनात पालकमंत्री नाम. श्री.आबिटकर यांची भूमिका आमदार असताना आंदोलक म्हणून होती. सद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पालकमंत्री. नाम. श्री आबिटकर सकारात्मक चर्चा करत आहेत. मात्र, तालुक्यातील टोल नाका स्थलांतरित झाल्यानंतर आजरा तालुकावासीयांना हा टोल माफ होणार का? तसेच टोल नाका तालुक्याच्या बाहेर नेल्याने तालुक्यातील प्रश्न सुटणार का, असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

समितीने पुढे नमूद केले की, मुळात टोल हद्द संपल्यानंतर जिल्ह्याची हद्द बदलते, त्यामुळे टोलचा विषयच उरत नाही. मग टोल नाका नेमका कुठे होणार? कारण पुढे वन विभागाची हद्द लागते आणि वन हद्दीत टोलनाका उभारता येत नाही. केंद्रीय व राष्ट्रीय महामार्गाच्या धोरणानुसार भविष्यात जीपीएस किंवा कॅमेऱ्याच्या आधारे टोल वसुली होऊ शकते. टोल माफी झाल्यास कोणत्या वाहनांना ती लागू होईल, याबाबतही संभ्रम आहे.
चौकट : समितीच्या प्रमुख मागण्या.
१) टोल विरोधी संघर्ष समिती, प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आजरा येथे घ्यावी.
२) टोलनाका किती अंतरावर असावा, पहिला टोल नाका किती अंतरावर आहे, मग दुसरा टोल नाका का लादला जातो, याचे स्पष्टीकरण द्यावे.
३) नागरिकांमधील संभ्रम दूर करून तालुक्यातील नागरिकांना टोलमुक्त करावे.
यावेळी पत्रकार परिषदेस कॉम्रेड संपत देसाई, संजय तर्डेकर, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, परशुराम बामणे, प्रकाश मोरस्कर, प्रभाकर कोरवी, विष्णू जाधव यांच्यासह टोल विरोधी संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.




