HomeUncategorizedवरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून गैरसमज दूर करावेत.- दिल्लीतील भाजप नेतृत्वाने घेतली गंभीर...

वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून गैरसमज दूर करावेत.- दिल्लीतील भाजप नेतृत्वाने घेतली गंभीर दखल

वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून गैरसमज दूर करावेत.- दिल्लीतील भाजप नेतृत्वाने घेतली गंभीर दखल

मुंबई – प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चिघळल्याचे शुक्रवारी पुन्हा दिसून आले. पाडापाडीच्या आरोपांवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीर टीका केली. या घडामोडींची दिल्लीतील भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून गैरसमज दूर करावेत आणि वादावर पडदा टाकावा, असे निर्देश दिल्याचे खात्रीलायक समजते.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. गुरुवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विरोधकांप्रमाणे जाहीर टीका केली होती. हा वाद थांबेल, अशी अपेक्षा असतानाच शुक्रवारीही आरोपांचा भडीमार सुरूच राहिला.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. धंगेकर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे सांगत, त्यांनी वारंवार पक्ष बदलल्याचा आरोप बन यांनी केला. पुणेकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना नाकारले, तसेच पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांचे डिपॉझिट जप्त झाले, अशी टीकाही त्यांनी केली. अशा व्यक्तींनी भाजपला शिकवू नये, असे बन म्हणाले.

भाजपच्या या टीकेला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेना नेते नीलेश राणे यांनी प्रदीप पूर्णकर हत्या प्रकरणाचा उल्लेख करत, मित्रपक्ष म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांची बाजू का घेतली नाही, असा प्रश्न केला. ‘आम्ही जबाबदारी एकमेकांवर ढकलणार नाही; पण आमच्या नेत्यांवरील टीका कशी सहन करायची’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांनीही भाजप प्रवक्त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. विधान परिषद निकालानंतर मित्रपक्षांच्या प्रवक्त्यांनी शिवसेना नेत्यांबाबत वापरलेली भाषा महायुतीसाठी योग्य नाही, असे ते म्हणाले. ‘मित्रपक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळावी. प्रत्येकाने संयम राखला पाहिजे. आपल्याला दिलेल्या पदाच्या मर्यादा ओलांडून कोणीही शिवसेनेवर टीका करू नये’, अशी भूमिका परांजपे यांनी मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा अजित पवार यांच्यात महायुतीतील समन्वयाबाबत चर्चा होईल. ‘मित्रपक्षांवर टीका करू नये, तसेच ‘दोस्तीत कुस्ती नको’, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिले आहेत. ‘महायुतीत शिवसेना नेत्यांकडून मित्रपक्षांच्या नेत्यांवर टीका होणार नाही. अशीच भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अपेक्षित आहे’, असे आनंद परांजपे म्हणाले.
दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी परस्परांवर जाहीर टीका केल्याने महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेतृत्वाने राज्यातील भाजप आणि शिवसेना नेतृत्वाला समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. गैरसमज दूर करून वाद वाढू न देणे आणि महायुतीची प्रतिमा सांभाळणे, यावर भर देण्यास सांगण्यात आल्याचे समजते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.