HomeUncategorizedबाजार व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयापूर्वी व्यापाऱ्यांशी चर्चा करा.- आजरा एकसंध व्यापारी...

बाजार व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयापूर्वी व्यापाऱ्यांशी चर्चा करा.- आजरा एकसंध व्यापारी मंडळ🟣हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीची गडहिंग्लज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी.( ग्रामसेवक एस. के. येळणे यांच्याविरोधात झाली होती तक्रार.)🟣आजरा शहरातील मोकाट कुत्रे व घोड्यांचा बंदोबस्त करा.🟣बामनादेवी पातसंस्थेकडून शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी.

🟣बाजार व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयापूर्वी व्यापाऱ्यांशी चर्चा करा.- आजरा एकसंध व्यापारी मंडळ
🟣हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीची गडहिंग्लज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी.
( ग्रामसेवक एस. के. येळणे यांच्याविरोधात झाली होती तक्रार.)
🟣आजरा शहरातील मोकाट कुत्रे व घोड्यांचा बंदोबस्त करा.
🟣बामनादेवी पातसंस्थेकडून शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी.

🟣बाजार व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयापूर्वी व्यापाऱ्यांशी चर्चा करा.- आजरा एकसंध व्यापारी मंडळ

आजरा : – प्रतिनिधी.

आजरा शहरातील आठवडी बाजार आयोजित करणे अथवा दुकाने व बाजार बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाने नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आजरा हे तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. नगरपंचायतीकडून स्वच्छता, अतिक्रमण, कर आकारणी, आठवडी बाजाराचे नियोजन तसेच दुकाने अथवा बाजार बंद ठेवण्याबाबत घेतलेले निर्णय व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवसायावर व उत्पन्नावर परिणाम करतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी संघटनेला पूर्वकल्पना देऊन चर्चा करावी, व्यापाऱ्यांच्या अडचणी व व्यावहारिक बाबी समजून घेऊन निर्णय घ्यावा आणि प्रशासन व व्यापारी यांच्यात संवाद व सहकार्याची भावना वाढीस लागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष महेश नार्वेकर, सचिन इंदुलकर, दयानंद भोपळे, मल्लिकार्जुन तेरणी, संजय हरेर, राजेश विभुते, श्रीपाद कुलकर्णी, बाळासाहेब पाचवडेकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

🟣हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीची गडहिंग्लज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी.
( ग्रामसेवक एस. के. येळणे यांच्याविरोधात झाली होती तक्रार.)

आजरा :- प्रतिनिधी.

हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. के. येळणे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर तालुक्याबाहेरील समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी गडहिंग्लज पंचायत समितीचे असिस्टंट गटविकास अधिकारी विलास पाटील व विस्तार अधिकारी उत्तम पाटील यांनी ग्रामपंचायतीची तपासणी केली.
यावेळी उपसरपंच प्रशांत कोटकर, ग्रामपंचायत सदस्य आदित्य कातकर, ग्रामपंचायत सदस्या मनीषा कांबळे, सरिता केसरकर, लता जाधव, गीता सुतार तसेच ग्रामस्थ डॉ. रोहन जाधव, पांडुरंग जाधव, डॉ. सुधाकर जाधव, संदीप गिलबिले व सुबोध कांबळे उपस्थित होते. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे व तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेण्यात आली. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल अशी अपेक्षा ग्रामपंचायत यांनी व्यक्त केली आहे.

🟣आजरा शहरातील मोकाट कुत्रे व घोड्यांचा बंदोबस्त करा.

आजरा : – प्रतिनिधी.

आजरा शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच अंतर्गत गल्लींमध्ये मोकाट कुत्र्यांचा व मोकाट घोड्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाने नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना अडचणी येत असून, कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांची शक्यता वाढली आहे. तसेच मोकाट घोडे दुकाने व रस्त्यांवर उभे राहून व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मांस व चिकन विक्रेत्यांकडून टाकण्यात येणाऱ्या टाकाऊ अवशेषांमुळे मोकाट कुत्रे शहराकडे आकर्षित होत असल्याचेही व्यापारी मंडळाने निदर्शनास आणले आहे.
नगरपंचायतीने शहरात तातडीने कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण मोहीम राबवावी, बाजारपेठ व शहरात फिरणाऱ्या घोड्यांचा मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच उघड्यावर मांस-मटणाचे अवशेष टाकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कचरा वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरमधून कचरा रस्त्यावर पडणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष महेश नार्वेकर, सचिन इंदुलकर, दयानंद भोपळे, मल्लिकार्जुन तेरणी, संजय हरेर, राजेश विभुते, श्रीपाद कुलकर्णी, बाळासाहेब पाचवडेकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

🟣बामनादेवी पातसंस्थेकडून शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी.

आजरा – प्रतिनिधी.

बामणादेवी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था जेऊर यांच्याकडून महाराष्ट्रात सरकारी व अनुदानित शाळा वाचवण्यासाठी ५ ऑक्टोबर पासून मुंबई आझाद मैदान येथे सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी रुपये पाच हजारचा निधी आज लढ्याचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांच्याकडे जमा केला.
खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीवरील शाळा वाचल्या पाहिजेत दलित, आदिवासी, बहुजन कष्टकरी शेतकरी यांच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजेत, शिक्षणाचे खाजगीकरण होता कामा नये, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रात हे आंदोलन उभे राहत आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरले आहेत. मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जेऊरकर ग्रामस्थ आणि बामनादेवी पतसंस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने सहभाग होणार आहेत बामणादेवी पतसंस्थेसारख्या छोट्या संस्थेने दिलेली ही मदत शिक्षण हक्काच्या चळवळीला बळ देणारी आहे. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार याची खात्री याची खात्रीच आम्हाला मिळाली आहे असे म्हणायला हरकत नाही. खेड्यातली एक छोटी संस्था शिक्षणाच्या चळवळीसाठी मदत करते हे अत्यंत महत्वाचे आहे. असे संपत देसाई म्हणाले.
संस्थेचे संचालक दशरथ भुरे मॅनेजर तानाजी मिसाळ याबरोबर शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचचे संजय तरडेकर, प्रकाश मोरुसकर, कॉम्रेड दत्ता कांबळे, मारुती पाटील, कॉ शांताराम पाटील, नामदेव फगरे, विजय पाटील यांच्यासह शाळा वाचवा शिक्षण वाचवा म्हणजे कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.