श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ होणार उद्या २९ रोजी.( आमदार प्रकाश आबिटकर यांनी ४ कोटी ५० लाखांचा निधी करून दिला उपलब्ध.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीचे प्रेरणास्थान व १३१ वर्षाची परंपरा असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या अद्यावत इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवार (दि. २९) रोजी स. ९ वा. संपन्न होणार आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत गंगामाई वाचनमंदिरचे अध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचुळकर हे असणार आहेत. या वाचन मंदिराची सुसज्ज इमारत उभी राहावी यासाठी आमदार श्री.आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर हे तालुकास्तरीय वाचनालय असून याची स्थापना १८८९ साली झाली आहे. १३४ पुस्तके व काही नियतकालिके यामाध्यमातून सुरु झालेल्या या वाचनालयात आजघडीला तीस हजारहून जास्त ग्रंथसंपदा आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भ ग्रंथ विभागात एक हजार हून अधिक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.
वीस हुन अधिक दैनिके व शंभरहून अधिक नियतकालिके ग्रंथालयात नियमित येतात. या ग्रंथालयाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक तसेच साहित्यिक यांना सेवा दिली जाते. वाचकांना ग्रंथालय सेवा देण्याबरोबरच ग्रंथालयातर्फे वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळ वाढीसाठी नियमितपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चर्चासत्र, व्याख्यानमाला, विविध शालेय स्पर्धा, साहित्य पुरस्कार, ग्रंथालय पुरस्कार असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. अशा या आजरा शहरासह तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मापदंड ठरणाऱ्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारतीसाठी निधी मिळावा अशी तालुकावासियांची मागणी होती. याला अनुसरून राधानगरी भुदरगड विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न होत आहे. वाचन मंदिरची निर्माण होणारी नवी वास्तू सर्वसोईंनीयुक्त अशी तयार होणार आहे.
वाचन मंदिराची नवी इमारत आजरा तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळ व वाचन संस्कृतीला बळकटी देणारी ठरणार आहे. या सोहळ्यासाठी समस्त वाचक, हितचिंतक तालुक्यातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री बाचुळकर यांनी केले आहे.