सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार – महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.
मुंबईः- प्रतिनिधी.
अजितदादांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार याचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या शनिवारी सकाळी ११ वा. बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यारूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातून बाहेर येण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी करण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुखपदही त्यांच्याकडेच राहावं यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते. पक्षाकडून होत असलेल्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकरण्यास तयार झाल्या आहेत.
अजित पवारांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शनिवारी, राष्ट्रवादीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड होणार आहे. सुनेत्रा पवार यांची त्या पदावर निवड होणार आहे. अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार..
