मुंबईकरांनो सावधान!
राजधानीत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या विशेष सूचना
मुंबई :- प्रतिनिधी.
जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे.मुंबई महापालिकेने एक प्रेस नोट जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेनं कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सूचना)देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णांसाठी वेगळी हॉस्पिटल्स
मुंबईत ट्रेसिंग टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजन बेड्सची सोय केली जाईल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएमसीचे सेव्हन हिल आणि कस्तुरबा रुग्णालय कार्यरत आहेत. तर कामा रुग्णलय, सेंट जॉर्ज रुग्णालय ,टाटा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय हे राज्य सरकारी रुग्णालय व इतर खाजगी 26 रुग्णालयं हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आहेत, असं महापालिकेनं सांगितलं आहे.
बीएमसीच्या वॉर्ड वार रूम 24*7 पुन्हा कार्यरत
आता पुन्हा एकदा बीएमसीच्या वॉर्ड वार रूम 24*7 कार्यरत राहतील. नागरिक कोरोना संबंधी या वॉर रुमला संपर्क करू शकतील. मुंबई महापालिका कोरोना नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू ठेवणार आहे.
नागरिकांसाठी बीएमसीच्या विशेष सूचना
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे
सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे
वेळोवेळी हात धुवावेत व स्वच्छता बाळगावी
आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे
ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच डायबिटीक किंवा हायपर टेन्शन रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.
कोरोनाच्या मागील काही लाटांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले होते. शिवाय अनेक दिवस राज्याच्या राजधानीत लॉकडाऊन देखील होता. त्यामुळं आता जगभरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुंबई पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याबाबत सूचना बीएमसीनं दिल्या आहेत.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात दिवसाला 2000 पर्यंत चाचण्या करण्याचे निर्देश
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला 2000 पर्यंत चाचण्या करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, नागरी आरोग्य केंद्र, रे्लवेस्टेशन्स या ठिकाणीही कोव्हिड चाचण्या सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या. सॅम्पल घेतल्यापासून 24 तासाच्या आत रिपोर्ट येणे अत्यंत आवश्यक आहे, यामध्ये कोणताही विलंब चालणार नाही, यासाठी तीन पाळ्यांमध्ये 24 तास लॅब सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. कोव्हिड लसीकरणावर भर देत असतानाच रुग्णालयातील औषधांची उपलब्धतता, ऑक्सिजनच्या पुरेशा टाक्या, बेड आदींची तयारी ठेवावी. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील मुलभूत सेवासुविधांची पाहणी करण्यात यावी. यामध्ये ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल, विद्युतीकरण व पाणीपुरवठा आदी सेवासुविधांचे ऑडिट करुन आवश्यकता असल्यास त्याचे काम करण्यात यावे. जेणेकरुन आगामी काळात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.