🟥डोंबिवलीत अग्नितांडव – एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग.– अनेक कर्मचारी अडकले..
रेस्क्यू ऑपरेशन सुरु
मुंबई :- प्रतिनिधी.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या दोन कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. एमआयडी परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
🔴मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर ती आग एरोसेल कंपनीपर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
🟥या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणाही तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. आग लागलेल्या कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली आणि तिचे कारण काय, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.