वारकरी एकात्मिकतेचा खरा विचार समजून घेतला पाहिजे.
श्यामसुंदर.- ( आजऱ्यात पहिले वारकरी किर्तनकार संमेलन उत्साहात संपन्न. )
आजरा :- प्रतिनिधी.

खऱ्या अर्थाने कीर्तन म्हणजे काय याकडे दुर्लक्ष होऊन किर्तन परंपरा वेगळ्या वळणावर जात आहे. अनेक वेगवेगळ्या आध्यात्मिक आघाड्या होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी आत्मसंशोधन करण्याची गरज असून वारकरी परंपरेचा एकात्मिकतेचा विचार दुषित करणाऱ्या पासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार व पत्रकार शामसुंदर सोन्नर यांनी केले.
आजरा येथील बाजार मैदानात सारथी फौंडेशनच्या वतीने आयोजित पहिल्या किर्तनकार संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
महाराष्ट्रात आधुनिक सुधारणा झाली कारण वारकरी संतांनी विचाराची बीज पेरणी केली.निंदा करायची असेल तर संतांची निंदा करणाऱ्यांची करावी.वारकरी परंपरा कोणत्याही एका धर्माचा नाही.कोणत्याही धर्माचा द्वेष वारकरी संप्रदाय करत नाही.नामदेव महाराजांच्या अगोदर कुणालाही किर्तन, मत व्यक्त करण्याचे अधिकारी नव्हते. ते अधिकार ज्ञानेश्वर महाराज, नामदेवरावांनी मिळवून दिले. नामदेवांनी वाळवंटात किर्तन सुरू केल्यामुळे सर्वांना किर्तन करण्याचा हक्क मिळाला.काम करत भगवंताची पुजा करा.स्त्रियांकडे निकोप दृष्टीने पहायला शिकवणारा वारकरी संप्रदाय आहे.
ह भ प राजाभाऊ चोपदार म्हणाले, संतांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता सांगितले तीच मूल्ये राज्यघटनेत आली आहेत. संत परंपरेचा प्रभाव महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आला. तेच विचार शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. संताचा विचार भारतासह नेपाळने स्विकारला.संत विचार जगभर पसरत आसताना काही जण संकुचित वागत आहेत.रंगाच्या आधारावर धार्मिक रंग देणे चूकिचे आहे. वारकरी परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे.आनंदी जीवन वारकरी संप्रदायाच्या विचारात आहे. वारकऱ्यांच्या नेत्यांची प्रबोधनाची गरज असून वारकऱ्यांची नाही.
यावेळी देवदत्त परळेकर म्हणाले, श्रेष्ठ साहित्य केवळ वेदनेतून निर्माण होते. ज्ञानेश्वरांनी रेडा समजणा-या दुबळ्या, अस्पृश्य, बहुजन समाजाला वेद बंदी उठवली.किर्तन म्हणजे नाम आणि नाम म्हणजे परमेश्वर.प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणजे किर्तनकारच आहे.

स्वागताध्यक्ष सुनिल शिंत्रे म्हणाले, वारकरी परंपरेच्या विचाराचा प्रसार व्हावा,संतांचा आदर्श तरूणांनी घ्यावा. वारकरी संमेलनातून चांगले बी पेरावे यासाठी किर्तनकार संमेलनाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, गोकूळच्या संचालिका व निमंत्रक अंजना रेडेकर, जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ शिरगुप्पे, काँ.संपत देसाई,संजय घाटगे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. किरण पाटील, व प्रा. डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर मुकुदराव देसाई यांनी आभार मानले.

{ संत गाडगेबाबा महाराज. – यांच्या समाज प्रबोधन कीर्तनाचा आपल्या कलेतून प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी गाडगेबाबांच्या कीर्तनाचा एकपात्री नाटकातून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्रदर्शन दाखवले. }