राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गृहखात्यावर एकहाती कंट्रोल. – बदलले मुंबईतील पाचही सहपोलीस आयुक्त
मुंबई:- प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विभागातील वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या केल्या असून, आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना या विभागात नियुक्ती दिली आहे.विशेष म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करीत त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांना आणले आहे.
तसेच मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मधुकर पांडे आणि मिलिंद भारांबे यांची नियुक्ती केली असून, केवळ ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजित सिंग यांना तूर्तास अभय दिले आहे. एकूणच गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत भाकरी फिरवली असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक पोलीस आयुक्तही बदलल्याने आता खऱ्या अर्थाने फडणवीस यांचे सरकार कार्यरत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांना कायम ठेवत त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना हलवण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे समजते. रजनिश शेठ यांच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांना पुन्हा राज्यात आणण्याचे घाटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात मोठे फेरबदल होताना यला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी भारतीय पोलीस सेवेतील 15 ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. विशेष म्हणजे यात मुंबई पोलीस दलात 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी सत्य नारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस अधिकारी निशिथ मिश्रा यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहपोलीस आयुक्त करण्यात आलेय. प्रशासन विभागात सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार यांची वर्णी लावण्यात आली असून, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पडवळ यांची निवड केली आहे. तसेच आयपीएस अधिकारी लखमी गौतम यांच्याकडे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील पाचही आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईच्या महत्त्वाच्या विभागात नियुक्ती देऊन पोलीस दलावर आपला अंकुश कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईचं पोलीस खाते आपल्या हातात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतोय. तसेच मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी तर राजवर्धन यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दाते यांच्या जागी मधुकर पांडे यांची बदली झाली आहे. तसेच बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या देवेन भारती यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त बनवण्याची शक्यता आहे. जेणेकरून मुंबईसह उपनगरातील पोलीस दलातही देवेंद्र फडणवीसांचा दबदबा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच आरती सिंह यांच्याकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस मुंबई, नामदेव चव्हाण पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, निसार तांबोळी अतिरिक्त पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई, ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे मुंबई, रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई या पदावर नेमण्यात आले आहे.
तसेच पवार कुटुंबीयांचे जवळचे समजले जाणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांना पदोन्नती देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी मारत आपला दबदबाही कायम राहणार आहे. तर मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दाते यांच्या जागी मधुकर पांडे यांची बदली झाली आहे. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था या पदी नियुक्ती देण्यात आली आहे. विनय कुमार चौबे यांच्याकडे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निकेत कौशिक यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या पदावर नेमण्यात आले आहे. शिरीष जैन यांना सहआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, संजय मोहिते यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महासंचालक या पदावर तर नवीनचंद्र रेड्डी यांना अमरावती शहराचे पोलीस आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे