राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो. – नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही.- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यपालांवर निशाणा
मुंबई – प्रतिनिधी.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईमध्ये सभा पार पडली. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना त्यांनी यावेळी चांगलेच फैलावर घेतले. यासोबतच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. कोश्यारीचं वय काय? ते बोलतायेत काय? राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर टीका करणाऱ्यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. आंदोलन करूनही प्रश्न मनसेलाच विचारले जातात. भूमिका न घेणाऱ्यांना प्रश्न का विचारले जात नाहीत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची पुस्तीकाच काढणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आमच्या आंदोलनामुळे राज्यातील 65 ते 67 टक्के टोल नाके बंद झाले. मनसेने मराठी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आंदोलन केलं. मनसेच्या आंदोलनामुळे पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी झाली. मनसेच्या आंदोलनामुळे मशिदीवरील भोंगे उतरले असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी नेहरुंवर टीका करणाऱ्यांना देखील त्यांनी फटकारलं आहे.