मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचें आकस्मिक निधन – पोलीस दलात शोककळा
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गायकवाड हे नवी मुंबईतील उलवे येथील निवासस्थानातून कर्तव्यावर येत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
मुंबईच्या कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड हे नवी मुंबई उलवे येथील आपल्या राहत्या घरातून कर्तव्यावर निघाले असताना पोलीस ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. सुशील कुमार गायकवाड हे काल पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांचा वाढदिवस साजरा करून घरी नवी मुंबई उलवे येथे गेले होते.
मात्र, आज सकाळी कर्तव्यावर येत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या ड्रायव्हर आणि ऑपरेटरला याबाबत माहिती दिली. “मला बरं वाटत नाही, थोडा गाडीतच आराम करतो मला उशी द्या” असे म्हणत ते गाडीतच झोपी गेले. मात्र, कुरार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने आवाज दिल्यानंतरही ते उठले नाहीत. त्यामुळे, ड्रायव्हरने हाताने हलवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरीर पूर्ण थंड पडले असल्याचे दिसले, सोबतच तोंडातून फेस देखील आला होता. त्यानंतर ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी तात्काळ मालाड पठाणवाडी येथील डीएनए रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.




