जनता गृह तारण संस्थेकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; दोन पगार बोनस जाहीर.
आजरा – प्रतिनिधी.
जनता सहकारी गृह तारण संस्था मर्या. आजरा येथे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
संस्थेकडे आज १३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असून सभासदांचा विश्वास व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ही प्रगती शक्य झाली आहे. संस्थेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत चेअरमन श्री. मारुती मोरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १६.६६ टक्के म्हणजेच दोन महिन्यांचा पगार बोनस, ड्रेसकोड, दिवाळी फराळ व साहित्य भेट जाहीर केली.
यावेळी व्हा. चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर म्हणाले की, अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून संस्थेने सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला असून ठेवी व कर्जाचे योग्य प्रमाण राखत अनेकांची घराची स्वप्ने पूर्ण केली आहेत. कर्मचाऱ्यांनी भविष्यातही पूर्ण क्षमतेने काम करून संस्था नावारुपाला आणावी.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले. यावेळी संचालक प्रा. रवींद्र आजणेकर, प्रो. (डॉ.) तानाजी कांबळे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार, मॅनेजर मधुकर खबरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
बोनस मिळाल्याबद्दल कर्मचारी आनंदी असून संस्थेच्या प्रगतीसाठी एकदिलाने काम करू, असे मॅनेजर मधुकर खबरे यांनी सांगितले.




