🛑प्रवासी लक्झरी बसमधून होणाऱ्या अवैध मालवाहतूकीवर कारवाई करा!.- वाहनचालक असोसिएन अध्यक्ष विजय जांभळे यांची ( जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
अन्यथा २६ जानेवारीला उपोषण छेडणार.)
🟥भंगसाळ नदीतील गाळ काढण्याबाबत ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
🔴अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हल्ले.- तालिबानकडून जोरदार प्रत्युत्तर.👇
वेंगुर्ले :- प्रतिनिधी.
प्रवासी लक्झरी बसमधून अवैध होत असलेल्या मालवाहतुकीबाबत आरटीओ अधिकारी कुठलीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे वाहनचालक असोसिएन अध्यक्ष विजय जांभळे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधले. याबाबत कार्यवाही न झाल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास बसण्यासाठी निवेदन देण्यात आले.
🔴पुणे ते गोवा चालणाऱ्या बसेसवर गाडीचा डिक्की व कॅरियरवर प्रमाणापेक्षा अधिक ओवरलोड लगेच वाहतूक केली जाते. या सर्व बसेस खेड-शिवापूर, सातारा, कराड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सर्व आरटीओ चेकपोस्ट पास करून सिंधुदुर्ग आरटीओचा नाकावर टिचून गोवाला प्रवेश करतात. या लगेच वाहतूकीमुळे प्रवाशांचा जिवाशी खेळ चालला असून टेम्पो व्यवसाय पण धोक्यात आला आहे. आज टेम्पोचालक -मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच 1 जानेवारीला भरमसाठ दर 2500 ते 3000 पर सीट रेट लावून प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. हे सर्व नाही थांबल्यास 26 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग आरटीओ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे यांनी दिला आहे. या उपोषणास काही टेम्पो मालक-चालक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
याबाबत अधिक चौकशी केली असता माहिती अधिकारात मागील 1 वर्षात आर.टीओ इन्सुली यांनी महिन्याच्या 1 व 2 तारीखला गाडीचा कॅरियर वर लगेच असेल तर 10000 व फक्त डिक्कीमध्ये लगेच असल्यास 4000 चा मेमो 1 व 2 तारीख ला या दोन दिवसात सर्व बसेस ना दिला आहे. तसेच 3 ते 30 तारीखपर्यंत फक्त 200 एन्ट्री घेऊन गाड्या सोडत आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, जिल्हा आरटीओ बांदा पोलीस स्टेशन व इन्सुली चेकपोस्ट येथे देण्यात आली आहे.
🟥भंगसाळ नदीतील गाळ काढण्याबाबत ठाकरे शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कुडाळ :- प्रतिनिधी.
कुडाळ शहराच्या नजीकहून वाहणाऱ्या भंगसाळ या नदीतील गाळ काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शिवसेना युवासेनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे माजी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतीमधील शिवसेना नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
🟥या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ शहराच्या नजीक वाहणाऱ्या भंगसाळ नदीला पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होते. यामुळे येथील शेती आणि व्यापारी वर्गाचे नुकसान होते. या नदीतील गाळ काढल्यास नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.तसेच हा गाळ काढल्यास नजीकच्या केटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा निर्माण होईल. या पाण्याचा उपयोग कुडाळ शहर, एमआयडीसी, शेती आणि चिपी विमानतळास होतो. त्यामुळे नदीतील गाळ काढल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच एप्रिल आणि मे महिना अखेरीस होणाऱ्या पाणीटंचाई आणि पुरस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप आदी उपस्थित होते.
🔴अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हल्ले.- मशिदीवर डागले रॉकेट.- तालिबानकडून जोरदार प्रत्युत्तर
काबूल :- वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष अधिकच चिघळत आहे. पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये हल्ले वाढले आहे. दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांच्या सीमा रेषेत घुसून कारवाई करत आहे. सोमवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आठ नागरिकांची हत्या केली. तसेच १३ जण गंभीर जखमी झाले.
🔴पाकिस्तानने पक्तिया येथील एका मशिदीवर रॅकेट हल्ला केला. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अफगाणिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय दखल देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमधील नागरिकांना लक्ष केले जात असल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. टोलो न्यूजमधील रिपोर्टनुसार, तालिबान संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, डूरंड लाइनवर दोन्ही बाजूंनी हिंसक चकमक होत आहे. तालिबानने पाकिस्तानी लष्कराच्या दोन चौक्यांवर कब्जा केला आहे. तालिबानी सैनिकांनी ड्युरंड रेषेवर असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या जाळल्या आहेत. या हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचे १९ सैनिक ठार झाले आहेत. त्यानंतर अनेक सैनिक चौक्या सोडून पळून गेले आहे. त्याचे व्हिडिओ अफगाणिस्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तालिबाने पाकिस्तानचा ध्वज काढून आपला ध्वज लावला आहे.
तालिबानीकडून गोजगढी, माटा सांगर, कोट राघा आणि मेंगल भागात जोरदार हल्ले केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्ताने म्हटले आहे की, पाकिस्तान लष्कराने खुर्रम आणि उत्तरी वजीरिस्तान भागात तालिबानकडून होणारी घुसखोरी रोखली आहे. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या हल्ल्यात ५० नागरिकांचा मृत्यू झाली आहे. त्यात अनेक महिला आणि मुले आहेत. यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दखल घेतली गेली पाहिजे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६४० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव ड्युरंड लाइन आहे. ही रेषा पश्तून आदिवासी भागातून आणि दक्षिणेकडील बलुचिस्तानमधून जाते. ही रेषा पश्तून आणि बलुच या दोन भागांत विभागली आहे. ती जगातील सर्वात धोकादायक सीमा देखील मानली जाते. या सीमेवरुन दोन्ही देशांत वाद आहे.
