🟥मरणानंतरही यातना.
रस्त्याअभावी तरुणाचा मृतदेह न्यावा लागला दीड किलोमीटर वाहून! – कुठे गेला रस्ते विकास.
🟥मुंबईत पुन्हा भीषण अपघात.- भरधाव टेम्पोने ५ ते ६ जणांना चिरडलं.- एकाचा मृत्यू!👇
🟥एक लेखिका, दुसरी इतिहास अभ्यासक.- डॉ. मनमोहन सिंग यांच्या तिन्ही मुली काय करतात? ( कौटुंबिक माहिती )
( केंद्र सरकारने 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केला जाहीर )
दापोली – प्रतिनिधी.
खेड तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या २१ वर्षे प्रदीप ढेबे या दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्याअभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटर हातातून घेऊन जावा लागला. त्यामुळे त्या मृतदेहाला मरणानंतरही यातना सहन कराव्या लागल्या. प्रदीप प्रकाश ढेबे (वय २१) रा.वावे-धनगर वाडी या दुचाकीस्वाराचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेनजीक घडला.
तळे-देऊळवाडी येथून प्रदीप ढेबे खेडच्या दिशेने येत होता. याचदरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर तो रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर जावून आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
प्रदीप ढेबे याच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली. परंतु ही रुग्णवाहिका किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली. त्यानंतर पुढील मार्ग खराब असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह हातात घेऊन तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत न्यावा लागला. मात्र रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना नेहमीच पायपीट करावी लागत आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. याबाबत ग्रामस्थांना विचारणा केले असता त्यांनी सांगितलं की, जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडलेले असून येथील नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही रस्त्यासाठी न्याय मागावा लागत आहे.
प्रदीप याच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसांपूर्वी याच गावतील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावे लागले. त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसेच वावे तर्फे नातू गायकर वाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केलेली आहे.
🟥मुंबईत पुन्हा भीषण अपघात.- भरधाव टेम्पोने ५ ते ६ जणांना चिरडलं.- एकाचा मृत्यू!
मुंबई – प्रतिनिधी.
मुंबईतील कुर्ला येथील बेस्ट अपघाताची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यानंतर घाटकोपरमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात भरधाव टेम्पोने ५ ते ६ पादऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या कुर्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी बेस्ट बस अपघाताची घटना घडली होती. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भरधाव बेस्टमुळे काही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या अपघातानंतर मुंबईत एकच भीती पसरली होती. त्यानंतर मुंबईत आणखी एका अपघाताची घटना घडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाला आहे.
मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भरधाव टेम्पोन पाच ते सहा पादचाऱ्यांना चिरडलं आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील टेम्पो चालक दारूच्या नशेत होता का, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. या अपघातानंतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
🟥एक लेखिका, दुसरी इतिहास अभ्यासक.- डॉ. मनमोहन सिंग यांच्या तिन्ही मुली काय करतात? ( कौटुंबिक माहिती )
( केंद्र सरकारने 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केला जाहीर )
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

देशाचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. केंद्र सरकारने 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
🅾️डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात आले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. 1958 मध्ये त्यांनी गुरशरम कौर यांच्याशी विवाह केला. गुरशरण या इतिहासाच्या प्रोफेसर आणि लेखिका आहेत. सिंग दाम्पत्याला उपिंदर सिंग, अमृत सिंग आणि दमन सिंग या तीन मुली आहेत. तिन्ही मुलींनी आपापल्या क्षेत्रात खास ठसा उटवलेला आहे.
🔴उपिंदर सिंग या प्रख्यात इतिहास अभ्यासक असून अशोका विश्वविद्यालयाच्या डीन आहेत. प्रोफेसर विजय तन्खा यांच्याशी त्यांनी विवाह केला असून त्यांना दोन मुलं आहेत. उपिंदर सिंग या दिल्ली विश्वविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज आणि मॉन्ट्रियलच्या मॅकगिल विद्यापीठात पदवी घेतलेली आहे. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, पुरातत्व आणि राजकीय विचारांवर त्यांनी रिचर्स केलेला आहे. ‘ए हिस्ट्री ऑफ एन्सीएंट अँड अर्ली मीडीवियल इंडिया’ आणि ‘पॉलिटिकल व्हायलन्स इन एंसीएंट इंडिया’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
🔴डॉ. मनमोहन सिंग यांची दुसरी मुलगी दमन सिंग या लेखिका आहेत. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग याच्या आयुष्यावर ‘स्टिक्टली पर्सनल मनमोहन अँड गुरशरण, ए मेमोयर’ हे पुस्तक लिहिलेले आहे. यात त्यांनी मनमोहन सिंग यांच्या खासगी जीवनावर प्रकाश टाकला आहे. यासह त्यांनी ‘द सेक्रेड ग्रोव’, ‘नाईन बाय नाईन’, ‘द लास्ट फ्रंटियर- पिपल’ आणि ‘फॉरेस्ट इन मिझोरम’ ही पुस्तकेही लिहिलेली आहेत. त्यांच्या पतीचे नाव अशोक पटनायक असून ते 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते हिंदुस्थानच्या एनएटीजीआरआयडीचे सीईओ आहेत.
🅾️तर तिसरी मुलगी अमृत सिंग प्रसिद्ध वकील असून स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमध्ये प्रॅक्टिस ऑफ लॉच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी जगविख्यात येल लॉ स्कूल, ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विश्वविद्यालयात शिक्षण घेतलेले आहे. ‘गार्डियन’ आणि ‘द न्यूयॉर्ट टाइम्स’ सारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्येही त्या लेख लिहितात.
