खळबळजनक
🟥सोलापूरात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न.- संबंधित तरूण पोलीसांच्या ताब्यात.
🟥रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अंदाजे ६४ टक्के मतदान.- निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह.
सोलापूर :- प्रतिनिधी.
सोलापूरमध्ये लोकसभेसाठी मतदान सुरू असताना एकाने चक्क ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ही घटना घडली आहे. पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर काही काळ मतदानाची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान या प्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
🅾️मतदान करण्यासाठी केंद्रात आलेल्या तरुणाने ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ईव्हीएम मशीन खराब झाली. यानंतर याठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन आणून फेरमतदान घेतलं गेलं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे.सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच राज्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. पहिल्या एक तासातच सोलापूर लोकसभेसाठी १२ टक्के तर माढा लोकसभेसाठी १० टक्के मतदान झाले होते.
🟥मतदान प्रक्रिया सुरुळित सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एक खळबळजनक घटना घटली आहे. मतदानासाठी आलेल्या एका तरुणाने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगलीत पळापळ झाली. या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त होत ईव्हीएम पेटवल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मतदान अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ईव्हीएम पूर्णपणे जळालं असून नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली गेली.
🟥रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अंदाजे ६४ टक्के मतदान.- निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 लाख 8 हजार 745 इतक्या पुरुष तर 3 लाख 98 हजार 816 इतक्या महिला अशा एकूण 8 लाख 7 हजार 562 मतदारांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
🔴जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. आज सांयकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 265 चिपळूण – 69 हजार 783 पुरुष, 72 हजार 175 महिला असे एकूण 1 लाख 41 हजार 958, 52.62 टक्के, 266 रत्नागिरी – 80 हजार 702 पुरुष, 82 हजार 224 महिला, इतर 1 असे एकूण 1 लाख 62 हजार 927, 57.46 टक्के, 267 राजापूर – 53 हजार 971 पुरुष, 56 हजार 604 महिला असे एकूण 1 लाख 10 हजार 575, 47.31 टक्के, 268 कणकवली – 64 हजार 789 पुरुष, 60 हजार 783 महिला असे एकूण 1 लाख 25 हजार 572, 55.14 टक्के, 269 कुडाळ – 67 हजार 633 पुरुष, 61 हजार 817 महिला असे एकूण 1 लाख 29 हजार 450, 60.96 टक्के, 270 सावंतवाडी – 71 हजार 867 पुरुष, 65 हजार 213 महिला असे एकूण 1 लाख 37 हजार 80, 61.07 टक्के.
🅾️लोकसभा मतदार संघातील एकूण 14 लाख 51 हजार 630 मतदारांपैकी 8 लाख 7 हजार 562 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी 5 वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी 55.63 आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता असून, 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी 61.99 टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.
