३० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न कायम.
वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी चक्क ( ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार.)
यवतमाळ | प्रतिनिधी.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने एका वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मदनापूर येथील ज्येष्ठ नागरिक रामदास पुरुषोत्तम मानकर (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार कुठे करावेत, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाला. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने मृताचे पुत्र विजय मानकर यांनी वडिलांचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आणून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला.
या घटनेने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मारेगाव तालुक्यातील तब्बल ३० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात उघड्यावर, चिखलात किंवा शेताच्या बांधावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ अनेक गावांतील नागरिकांवर येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक आमदार संजय देरकर यांनीही विधानमंडळात स्मशानभूमीसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे.
ग्रामस्थांनी, “जिवंतपणी मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि मृत्यूनंतरही सन्मानाने निरोप देण्याचा हक्क हिरावला जात आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत शासनाने तातडीने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
