HomeUncategorizedपहा देशातील राज्यातील दिवसभराच्या घडामोडी आज उद्या व परवा काय होणार देशात...

पहा देशातील राज्यातील दिवसभराच्या घडामोडी आज उद्या व परवा काय होणार देशात राज्यात मराठा आरक्षण व राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा…🚩👇 🔴मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीसांच्या सुट्ट्या रद्द.🟥आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार.- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.🛑मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त.- १ हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण.🟥 अयोध्या नगरी सजली.-उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण.

पहा देशातील राज्यातील दिवसभराच्या घडामोडी आज उद्या व परवा काय होणार देशात राज्यात मराठा आरक्षण व राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा…🚩👇

🔴मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीसांच्या सुट्ट्या रद्द.
🟥आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार.- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.
🛑मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त.- १ हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात
🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण.
🟥 अयोध्या नगरी सजली.-उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण.

मुंबई:- प्रतिनिधी.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जालना-मुंबई अशी संभाव्य पदयात्रा कढणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान राज्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय रजा वगळण्यात आली आहे.
🔴साप्ताहिक सुट्ट्या रद्द करताना शासन निर्णयाचे पालन करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत खालील नमुद घटकांमधील सर्व अधिकारी व अंमलदार (कार्यकारी व अकार्यकारी पदावरील) यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यास घटक प्रमुख यांना मान्यता देण्यात येत आहे.
तसेच घटकातील साप्ताहीक सुट्टी बंद करताना उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. तरी, घटक प्रमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता सर्वोतोपरी दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे. हे आदेश देतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. सर्व पोलीस आयुक्तालये, गुप्तवार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षल विरोधी अभियान, विशेष कृती दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून शनिवारी सकाळी संबंधित पोलिसांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. २० ते २८ जानेवारीपर्यंत कुणालाच सुटी घेता येणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.

🛑मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ जानेवारीपासून सर्वेक्षण केले जाणार

मुंबई:- प्रतिनिधी.

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी दिलासा मिळालाआहे. या सर्वेक्षणासाठी अंदाजे दीड लाखाहून अधिक प्रशासकीय अधिकारी सर्वेक्षण करणार आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण सिद्ध करायचे झाल्यास नागरिकांनी घरी थांबणे गरजेचं आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिक रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्यास आणि घरी नसल्यास सर्वेक्षणात अनेक अडथळे निर्माण होतील. २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातील अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामंकीत संस्थांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंड्या द्या, नागरिकांना माहिती द्या, चोवीस तास कॉलसेंटर सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठक पार पडली. बैठकीसाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव कलोते यांची उपस्थिती होती. कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्त्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत. ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरू झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र, बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे याचा व्यवस्थित नोंद नेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

🟥आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार.- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई:- प्रतिनिधी.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याने दुसऱ्या दिवशी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा मुदत बदलण्यात आली आहे.
या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव राजेश कुमार सिंग यांनी काल उशिरा परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापूर्वी २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांना नोंदणी तसेच मयत आणि दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी नऊ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, हरियाणा, झारखंड, केरळ, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली अशा १२ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत २२ जानेवारी दिली होती.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘देशात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला देशभर साजरा केला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयांना २२ जानेवारीला सुट्टीच जाहीर केली आहे. त्यामुळे त्या दिवशी सरकारी कार्यालये बंद असणार आहे. परिणामी, २२ ऐवजी २३ जानेवारीला आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबत आम्हाला निर्देश दिले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी शिष्टमंडळासमोर तयारीबाबत तपशीलवार सादरीकरण केले. ‘पोलीस आणि इतर अंमलबजावणी संस्थांना अनधिकृत रोकड, दारू, ड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राज्य निवडणूक यंत्रणेने कडक दक्षता आणि देखरेखीसह प्रलोभनमुक्त निवडणुकांवर भर द्यावा, असे आदेश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला, तरुण तसेच उपेक्षित गट, ज्यामध्ये अपंग व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर मतदार आणि नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

🛑मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त.- १ हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात

पुणे – प्रतिनिधी.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मोर्चा काढला असून, पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.१ हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात राहणार आहेत.
🟥नगर रस्तामार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे. कोरेगाव भीमा परिसराचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. २३ जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी असणार आहे. वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्काम असणार आहे. तेथे एक हजार प्रसाधन गृह, रुग्णवाहिका, १०० पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच एक हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. २४ जानेवारी रोजी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार असून, लोणावळा येथे मुक्कामी असणार आहे.

🟥मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत. तर उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण

मुंबई – प्रतिनिधी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळयास उपस्थित राहणार नसून ते नंतर सर्वांबरोबर अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टपालाने आमंत्रण पाठविण्यात आल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 🟥रामजन्मभूमी न्यासाने देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि विशेष व्यक्तींना सुमारे आठ हजारांहून अधिक आमंत्रणे पाठविली आहेत. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये देशातील राजकीय पक्षांच्या पक्षप्रमुखांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश वगळता देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आमंत्रणे पाठविण्यात आलेली नाहीत. महाराष्ट्रात ४०९ संतमहंत, सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींसह काही उद्योगपती, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नामवंत वकील उज्ज्वल निकम आदींना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. राजकीय नेत्यांमध्ये शिंदे गटाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे प्रमुख म्हणून शरद पवार आणि अजित पवार आदींना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आमंत्रित करण्यात आले असून प्रदेशाध्यक्षांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र शिंदे यांनी राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. आपल्याला या सुवर्ण सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले आहेत. या सोहळयासाठी मी, फडणवीस आणि अजित पवार अशा तिघांनी जाण्यापेक्षा सर्व मंत्री, आमदार, खासदार व अन्य नेत्यांसह लवकरच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

🅾️ठाकरे उद्या नाशिकमध्ये

अनेक कलाकारांना भेट घेऊन सोहळयाची आमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र ठाकरे यांना टपालाने आमंत्रण पाठवून अवमान करण्यात आला आहे. ठाकरे २२ जानेवारीला अयोध्येला जाणार नसून पूर्वघोषित कार्यक्रमानुसार नाशिकला जाऊन काळारामाचे दर्शन घेतील आणि गोदातीरी महाआरती करतील, असे राऊत यांनी सांगितले.

🟥 अयोध्या नगरी सजली.-उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण

अयोध्या – वृत्तसंस्था.

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना संपूर्ण अयोध्यानगरी रामरंगात रंगली आहे. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध नद्यांचे पाणी, कन्नौजमध्ये खास तयार केलेले अत्तर आले आहे. तसेच निमंत्रितांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे.शनिवारी श्रीरामाच्या मूर्तीला स्नान घालण्यासह विशेष विधी करण्यात आले तसेच देशभरातून विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने गाभाऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध १४ जोडप्यांची म्हणून निवड करण्यात आली आहे.मंदिरालाही फुलांची सजावट व रोषणाई केली जात आहे. मंदिर, त्याचा परिसर, तसेच प्रवेशद्वार सजवण्यासाठी मोठया प्रमाणात उत्तम दर्जाच्या फुलांचा तसेच विशेष दिव्यांचा वापर केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अयोध्येमध्ये ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा दिसत आहेत. चित्रकार विविध चित्रे काढत आहेत, रांगोळया सजत आहेत.प्राण प्रतिष्ठेसाठी खास तयार करवून घेतलेल्या वस्तूंबरोबरच भाविकांनी देशभरातून पाठवलेल्या वस्तूही अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये महाकाय घंटा, विशाल कुलुप, १२७६ किलो वजनाचा लाडू अशा वेगवेगळया वस्तूंचा समावेश आहे.शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोमवारी त्यामध्ये अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

🔴घोषणा आणि श्लोक

शहराच्या कानाकोपऱ्यात लावण्यात आलेल्या मोठमोठया होर्डिग्जवर ‘शुभ घडी आयी’, ‘तैयार है अयोध्या धाम, विराजेंगे श्री राम’ ‘राम फिर लौटेंगे’ अशा घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. अयोध्या में राम राज्य आणि ‘श्री अयोध्या धाम के कणकण मे चंदन है, आपका अयोध्या धाम में शत शत वंदन है’ या घोषवाक्यांसह राम मार्ग, सरयू नदी किनारा आणि लता मंगेशकर चौक अशा प्रमुख ठिकाणी पोस्टरवर रामायणातील विविध श्लोकही छापण्यात आले आहेत.

🅾️मोदींचे तमिळनाडूत मंदिर दर्शन

प्राण प्रतिष्ठा सोहळयापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत. शनिवारी त्यांनी तमिळनाडूमधील दोन प्राचीन मंदिरांमध्ये प्रार्थना केली. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम मंदिर आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील रामनाथस्वामी मठामध्ये त्यांनी प्रार्थना केली. श्रीरंगम मंदिरात त्यांनी कम्ब रामायण ऐकले. येथे त्यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिराला भेट म्हणून वस्त्रम देण्यात आले. तसेच मोदींनी रामेश्वरमच्या अंगीतीर्थ किनाऱ्यावर समुद्रात स्नान केले.

🟥देश-विदेशातून भेटवस्तूंचा वर्षांव

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तमिळनाडू आणि अफगाणिस्तानातून पाठवण्यात आलेल्या भेटवस्तू श्री राम मंदिराचे ‘यजमान’ अनिल मिश्रा यांच्याकडे शनिवारी सुपूर्द केल्या. भेटवस्तू देणारे वेगवेगळया धर्माचे असले तरी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला, असे आलोक कुमार यांनी काश्मीरमधून केशर दान करणाऱ्यांबद्दल म्हटले आहे. राम मंदिर रेखाटलेले रेशमी बेडशीटबद्दल तमिळनाडूतील रेशीम उत्पादकांनी पाठवली आहे. ती तयार करण्यासाठी १० दिवस लागले. अभिषेकासाठी आलेले अफगाणिस्तानच्या कुभा नदीचे पाणीही यजमानांना देण्यात आले.

🛑सायबर गुन्ह्यांपासून सतर्कतेचा इशारा

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येत सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अयोध्या पोलिसांनी शनिवारी इशारा दिला आहे. शहरात होणारा प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहता सायबर गुन्हेगार लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. सर्वसामान्यांना मोफत प्रसाद वाटप करण्यासाठी राम मंदिराच्या नावावर बनावट क्यूआर कोड पाठवून देणगी गोळा करून फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम मंदिराला भेट देण्यासाठी व्हीआयपी पास आणि प्रवेश पास देणे, राम मंदिर, अयोध्या या नावाने बनावट वेबसाइट तयार करणे, असे प्रकार उघडकीस आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही निनावी विनंतीला किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेशाला प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

🔴’राम की रसोई’ ते लंगर

अयोध्येत येणाऱ्या भाविकांना मोफत आणि गरम भोजन मिळावे यासाठी शहरात ठिकठिकाणी सामुदायिक स्वयंपाकघरे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये ‘राम की रसोई’पासून लंगपर्यंत अनेक धर्मादाय व सेवाभावी भोजन व्यवस्थांचा समावेश आहे. येथे येणारे भाविक शरयू नदीत स्नान केल्यानंतर अक्षरश: प्रत्येक गल्लीबोळात सुरू असलेल्या या भोजन व्यवस्थांचा लाभ घेत आहेत. खिचडी, बटाटयाची भाजी व पुरी, कढी-भात, पापड, लोणचे असा साधा आणि सर्वांना आवडणारा सात्विक आहार येथे दिला जात आहे.

अयोध्या रामरंगी रंगली.

अयोध्येत जागोजागी राम मंदिर रेखाटलेले झेंडे, धनुष्यधारी रामाचे कट आऊट, छायाचित्र, फलक यांमुळे संपूर्ण अयोध्या राममय झाल्याचे दिसत आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या पुनर्विकसित रस्त्याला रामजन्मभूमी पथ असे नाव देण्यात आले आहे. येथील एका इमारतीतील सार्वजनिक बँकेच्या नवीन शाखेला ‘रामजन्मभूमी’ शाखा असे नाव देण्यात आले आहे.
व्हिजिटिंग कार्डस, फलक आणि कॅलेंडरही भव्य मंदिराच्या प्रतिमांनी सजले आहेत.
शहरात फलक लावणाऱ्या प्रत्येक कंपनीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे राम मंदिराचे चित्रण केले आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवाही राममय झाल्याचे दिसून येते. संपूर्ण अयोध्येतील बस, रस्ते आणि अगदी मोबाइल फोन कॉलर टय़ूनमध्ये याचा प्रभाव आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बीएसएनएलने रामजन्मभूमी मार्गाशेजारी एका भिंतीजवळ मंदिराची प्रतिमा, छायाचित्रांनी जवळजवळ सर्व दुकानांच्या फलकांवर तसेच हॉटेल आणि लॉजच्या लॉबीच्या जागा पटकावली आहे.

🛑चुकीच्या मजकुराविरोधात सरकारचा इशारा.

अयोध्येत २२ जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या कार्यक्रमाबद्दल प्रसार माध्यम, समाजमाध्यमांनी कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, तसेच त्यात फेरफार करू नये, असे आवाहन सरकारने शनिवारी एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. विशेषत: समाज माध्यमांवर सत्यता पडताळणी न करता, चिथावणीखोर आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. वृत्तपत्रे, खासगी उपग्रह दूरचित्रवाहिन्या आणि डिजिटल माध्यम, प्रकाशकांनी खोटे किंवा फेरफार केलेले किंवा जातीय सलोख्याला हानी पोहोचवणारी किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारी कोणतेही लिखाण प्रकाशित आणि प्रसारित करणे टाळावे, असेही सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. असाच सल्ला समाजमाध्यमांनाही देण्यात आला आहे.

🛑 मराठ्यांचे वादळ मुंबईकडे – मनोज जरांगे यांची हजारो कार्यकर्त्यांसह कूच

जालना – प्रतिनिधी.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी साडेचार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करीत आहेत. दरम्यान, सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हजारो समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत. 🟥आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पोलिस-आंदोलक यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर या आंदोलनाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आणि राज्य शासनाच्या कायदा तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी शासनाला दोन वेळा मुदतवाढ दिली. पण, मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी ते अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला.🔴अंतरवालीतून हजारो समाज बांधव हाती भगवे झेंडे, गळ्यात भगवे रुमाल, डोक्यात टोप्या घालून चालत होते. ठीक ठिकाणी जरांगे यांचे महिलांनी औक्षण केले. पुढे गावोगावी यात आणखी भर पडली गेली. पदयात्रेत सहभागींनी जोरदार घोषणाबाजी करीत मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय परत न येण्याचा निर्धार केला. अंतरवाली सराटी येथून सकाळी ११ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली.वडीगोद्री ते अंकुशनगर हे अवघे पाच किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. हजारोंच्या गर्दीमुळे सोलापूर-धुळे महामार्ग तब्बल चार तास ठप्प होता. त्यामुळे ही पदयात्रा मुंबईत दाखल झाल्यावर मुंबईची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

🟥पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात शंभर पोलिस अधिकारी, साडेपाचशे पोलिस कर्मचारी, साडेचारशे होमगार्ड, एसआरपीएफची कंपनी, रॅपिट ॲक्शन फौर्सची कंपनी, आरसीपीच्या दोन कंपन्या बंदोबस्त कामी तैनात करण्यात येणार आहे. हा बंदोबस्त शहागडपर्यंत तैनात करण्यात आला होता. शिवाय या पायी यात्रेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली होती. राज्य सरकार फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा कायदा करणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्‍वास ठेवावा. आरक्षणासाठी सर्व्हे करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

व्हॅनिटी व्हॅनचा वापर जरांगेंनी टाळला.

बीड – प्रतिनिधी.

मुंबईला उपोषण यात्रेसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी बीडच्या समन्वयकांनी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध केली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी या व्हॅनचा वापर टाळला. शनिवारी अंतरवाली सराटीहून मातोरीकडे निघालेले मनोज जरांगे पाटील अंतरवाली ते शहागड कारखान्यापर्यंत पायी चालले. नंतर ते नियमित वाहनात बसले. पुढे काही काळ चालून पुन्हा त्यांनी त्याच वाहनाचाच वापर केला. मात्र, व्हॅनिटी व्हॅन त्यांनी टाळली. व्हॅनमध्ये शयनगृहासह शीतगृह, स्वच्छतागृह, टीव्ही अशा सुविधा आहेत.

🛑महिनाभराचे रेशन सोबत.

या पदयात्रेत राज्यभरातून आलेले समाज बांधव सहभागी आहेत. अनेकांनी आपआपली वाहनेही सोबत आणली. या वाहनांमध्ये महिनाभर पुरेल एवढे धान्य, पीठ, मीठ, तेल, चटणी असे साहित्य त्यांनी सोबत घेतले. शिवाय वाहनांमध्येच आराम करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये पिकअप, ट्रक, ट्रॅक्टर, कार, दुचाकी अशा विविध वाहनांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनामध्ये पाण्याचे जार, ट्रॅक्टरमध्ये पाण्याची टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या पदयात्रेत जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आरोग्य विभागाकडून दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. शहागडपर्यंत या दोन रुग्णवाहिका सोबत होत्या. पुढे ही यात्रा बीड जिल्ह्यात पोचली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.