आजरा तालुका इरिगेशन फेडरेशन स्थापन करणार – मोटर पंप धारक शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय.
🛑निधन वार्ता.-
पत्रकार सचिन चव्हाण यांचे दुःखद निधन.
🛑आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव.- नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान.
आजरा-प्रतिनिधी.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मोटर पंपाला जलमापक यंत्र (वॉटर मीटर) बसविण्याची सक्ती केली असून वॉटर मीटर न बसविल्यास दहा पट पाणी पट्टी आकारण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या निर्णयाने शेतकरी उध्वस्त होणार असल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर मोटरपंप धारक शेतकऱ्यांच्या वीज बीलाबाबत आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी आजरा तालुका मोटरपम्प धारक शेतकऱ्यांची आज रवळनाथ मंदिर येथे बैठक झाली या बैठकीत हा निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते. सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी प्रास्ताविक करून शासन प्रशासन आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. त्यांचे हक्काचे पाणी काढून घेऊन ते भांडवलदारांना त्यांना विकायचे आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्काची लढाई ही आपल्याला संघटितपणे लढावी लागणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आज पाटगाव धरण अदानीला विकले आहे उद्या आजरा तालुक्यातील धरणेही विकली जातील त्यामुळे ही लढाई आपल्याला नेटाने लढवावी लागेल. तानाजी देसाई म्हणाले की पाण्याबरोबर विजेचा प्रश्नही आपण एकत्रितपणे मांडुया, पाणी पट्टी वाढ आणि विजवाढ याविरोधात सर्व शेतकऱ्यांना संघटित करून ही लढाई आपल्याला लढवावी लागेल. आपल्या अध्यक्षीय भाषणात अल्बर्ट डिसोझा म्हणाले की राज्यात कोणतेही सरकार आले तरी ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार नाही. त्यासाठी आपल्यालाच आता मैदानात उतरावे लागेल. आपण चळवळ केली तरच आपण वाचू शकतो. त्यामुळे सर्वांनी आता संघटित संघर्षासाठी तयार रहावे. बैठकीला आनंदराव कुंभार, प्रकाश मोरूस्कर, जोतिबा चाळके, सचिन देसाई, सुरेश पाटील, बाबुराव गिलबिले, सयाजी कोडक, संजय देसाई, यशवंत कोडक, नरेंद्र कुलकर्णी, अविनाश जोशीलकर, दत्तात्रय पारदे, दशरथ घुरे, आबा पाटील, मसाजी पाटील, म्हकाळी चौगुले, शैलेश निर्मळे, प्रकाश दोरुगडे, नंदकुमार देसाई, सुनील पाटील, यशवंत पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
निधन वार्ता.-
पत्रकार सचिन चव्हाण यांचे दुःखद निधन.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा येथील इलेक्ट्रॉनिक एस.बी.एन लाईव्ह चॅनलचे आजरा ता. प्रतिनिधी पत्रकार सचिन मारुती चव्हाण यांचे रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. आजरा गडहिंग्लज चंदगड या परिसरातील बातम्यांचे लाईव्ह वृत्तान्गन तसेच महत्त्वाच्या घडामोडी करत होते अत्यंत निर्भीड असे पत्रकार मानले जात असत. समाजातील तळागाळापर्यंत त्यांचे कार्य अत्यंत चांगले होते.
त्यांचा मित्रपरिवार अफाट होता. आजरा शहरात मित्रांची त्यांचे अगदी जिवाचे संबंध होते त्यांच्या पश्चात वडील भाऊ वहिनी पुतणे पुतणी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने आजरा शहरात शोककळा पसरली आहे.
🔴आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव.- नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान
मुंबई:- प्रतिनिधी.
राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या धोरणानुसार आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दोनवेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र, पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे आदींनी सुधारणा सुचविल्याने हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते; पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मात्र, नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडला. त्या स्वतः कायम आईचे नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचे नाव लावत आल्या आहेत. त्यांच्या मंत्री दालनाची पाटीही ‘आदिती वरदा सुनील तटकरे’ अशी आहे. आता राज्यात या धोरणानंतर अशीच पाटी आणि असेच नाव लिहावे लागेल. ज्यामुळे मातृशक्तीला एक सन्मान मिळणार आहे. मात्र, या धोरणाची राज्य सरकारला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल.याशिवाय या धोरणात उद्योगात ३० टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ, सर्व रस्त्यांवर २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांसाठी मालमत्ताविषयक सवलती, घरून काम करण्याचा पर्याय तसेच मातृत्व आणि पितृत्व रजेची सवलत मिळण्यावरही भर देण्यात आला आहे.
