HomeUncategorizedराज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांची जाहीर नाराजी. 🔴छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही...

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांची जाहीर नाराजी. 🔴छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांची जाहीर नाराजी. 🔴छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री.

अलिबाग – प्रतिनिधी.

राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रायगडच्या शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिला आहे. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री असूनही ते जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कुठलेच प्रयत्न करत नाहीत आणि उद्योगमंत्री असूनही जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी देखील प्रयत्न करीत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
शिवसेना नेते मंगेश सातमकर यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांनाच लक्ष्य केले. राज्यात आपली सत्ता आहे. आमचे पालकमंत्री उदय सामंत हे स्वत: उद्योगमंत्री आहेत. असे असताना जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित करत नाहीत. जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत, परंतु आमचे उद्योगमंत्री असूनही आम्हाला नोकरी किंवा सीएसआर फंड मिळत नसल्याची खंत राजा केणी यांनी व्यक्त केली. पालकमंत्री उदय सामंत कधी येतात कधी जातात समजत नाही. जिल्ह्यातील शिवसैनिकांशी त्यांचा संवाद नाही. पालकमंत्री असूनही कधी पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत, अशा शब्दात राजा केणी यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनीही आपल्या भाषणात केणी यांची री ओढली. उद्योगमंत्री आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. एखादी जाहीर सभा किंवा पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा कधी घेतला नाही. आम्ही जिल्हाप्रमुख असताना जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला. आज सत्ता आहे, उद्योगमंत्री आपले पालकमंत्री आहेत, असे असताना आपल्याला न्याय मिळणार नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच म्हणावे लागेल, असे प्रकाश देसाई म्हणाले.
🟥निरीक्षक मंगेश सातमकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनी गावागावात जाऊन पक्षाचे, सरकारचे काम जनतेला समजून सांगावे. गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे ती यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार महेंद्र दळवी यांनी मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले. मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आगामी काळात आपण महायुती म्हणून पुढे जाऊ असे दळवी यांनी सांगितले.
🅾️जिल्हा महिला संघटिका संजीवनी नाईक यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले. याच कार्यक्रमात शैलेश चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, दीपक रानवडे, तालुका संघटक जीवन पाटील, महिला आघाडीप्रमुख शुभांगी करडे, महिला संघटक स्मिता चव्हाण, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे व्यासपीठावर उपस्थित होते.

🔴लोकसभेवर पुन्हा दावा.

काही दिवसांपूर्वी अलिबाग मुरुड रोहा तालुक्याच्या मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी रायगडच्या लोकसभा जागेवर दावा करावा, अशी मागणी केली होती. आजच्या सभेत पुन्हा नाराजी व्यक्त करीत केणी यांनी लोकसभेच्या जागेवर ठाम दावा केला.

🅾️सातमकरांची सारवासारव

आजच्या कार्यकारिणी बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र निरीक्षक मंगेश सातमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नाराजी नाही परंतु शिवसैनिकांनी त्यांची भूमिका मांडली. नेत्याने आपल्यासाठी वेळ द्यावा, आपल्या समस्या समजून घ्याव्यात असे कार्यकर्त्यांना वाटते. उदय सामंत राज्याचा कारभार पाहतात, त्यामुळे ते पुरेसा वेळ देवू शकत नसले तरी शक्य तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करतात, असे सातमकर यांनी सांगितले.

🔴🔴छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री.

राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळाला असून मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस आधीच संपवला आहे.दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि राजस्थानमध्येही तेच दिसून आले. मध्यप्रदेशमध्ये मोहन यादव, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई यांच्याकडे त्या-त्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपने छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवी हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर वासुदेव देवनानी हे राजस्थानचे नवीन विधानसभा स्पीकर असणार आहेत.
👉राजस्थानमध्येही १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री फॉर्म्युला.
राजस्थानात भाजपने भजनलाल शर्मा या नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले आहे. तर दोन उपमुख्यमंत्र्याची देखील घोषणा केली आहे. याचप्रमाणे मध्यप्रदेशातही भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला अंमलात आणला आहे. मध्यप्रदेशमध्ये आमदार ओबीसी प्रवर्गातील मोहन यादव यांची नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे. दरम्यान छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अरुण साव आणि विजय शर्मा यांना उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात आले. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना विधानसभा स्पीकर म्हणून निवडण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.