🟣 बोलकेवाडीत रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.
🟣आजरा पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीत.
🛑बोलकेवाडीत रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.
आजरा : – प्रतिनिधी.

बोलकेवाडी येथील रणरागिणी शेतकरी गट, बोलकेवाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. शिबिरात रक्तदानासोबतच रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन व बीएमआय तपासणी करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.
या कार्यक्रमास आजरा पंचायत समितीच्या सभापती यशोदा युवराज पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर भाऊ देसाई, सरपंच जी. एम. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, बोलकेवाडीचे सरपंच विलास जोशिलकर, ग्रामपंचायत सदस्य अमर डोंगरे, सरिता बोलके व रोहित शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निमंत्रक किशोर कातकर व नीता बोलके यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान हे जीवनदान देणारे महान कार्य असून अशा सामाजिक उपक्रमांमधून आरोग्याबाबत जनजागृती होण्यासोबतच तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागते.
🟣 आजरा पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीत.
आजरा : – प्रतिनिधी.

आजरा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन राजाराम पोतनीस यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी विविध पतसंस्थांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचे ठरले.
फेडरेशनकडे चालू आर्थिक वर्षात १६ संस्थांची २ कोटी ३९ लाख ७३ हजार ३७१ रुपयांची १०१ प्रकरणे आली असून, त्यापैकी २० प्रकरणे मंजूर झाली आहेत. उर्वरित प्रकरणे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वसुली अधिकाऱ्यांनी दिली. लहान संस्थांच्या वसुली कामी फेडरेशनची मदत मोलाची ठरत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

अंशदानाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेणे, पतसंस्थांबाबतच्या वृत्तांवर संपादकांना पत्रव्यवहार करणे तसेच संचालक व कर्मचाऱ्यांसाठी फेडरेशनमार्फत प्रशिक्षण घेण्याचे ठराव सभेत मंजूर करण्यात आले.
यावेळी व्य. चेअरमन राजश्री खोराटे, सुनील पाटील, भिवा जाधव, पांडुरंग ढवळे, अशोक तांबेकर, रमेश कांबळे यांच्यासह संचालक व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. आभार आनंदा कुंभार यांनी मानले.
