महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्यास गावागावात विकासाची गंगा अवतरेल.
आजरा.- प्रतिनिधी.

एरंडोळ ता. आजरा येथील महिलांमध्ये प्रचंड कष्ट करण्याची क्षमता असून त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात पुढाकार घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. महिलांना अशी संधी मिळाल्यास गावागावात विकासाची गंगा अवतरेल, असे प्रतिपादन सुनील कोंडुसकर यांनी केले.
एरंडोळ येथे डॉन बॉस्को गोवा आणि सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘Welead’ कार्यक्रमांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिलांचा मेळावा झाला. यावेळी कोंडुसकर बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एरंडोळचे उपसरपंच भीमराव माधव होते. कॉम्रेड संपत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाश मोरस्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून ‘Welead’ कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. पंचायत राज सक्षमीकरण, बळकटीकरण आणि महिलांमध्ये नेतृत्व विकसित करण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोंडुसकर म्हणाले, महिलांना कायम दुय्यम स्थान दिले गेले; मात्र आता हे दुय्यमत्व झुगारून महिला पुढे येत आहेत. महिलांनी पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व व क्षमता विकसित करावी. ग्रामसभा ही गावाच्या विकासातील महत्त्वाची व्यवस्था असून महिलांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभागी होऊन गावातील विकास, शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. कुटुंबाचे सक्षम व्यवस्थापन करणारी महिला गावाचा कारभारही प्रभावीपणे सांभाळू शकते. मात्र समाजकारण व राजकारणात महिलांना पुरेशी संधी मिळणे आवश्यक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना भीमराव माधव यांनी महिलांना राजकारणात संधी मिळावी आणि त्यांचे नेतृत्व विकसित व्हावे, यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले. कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
