खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे.- उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर घणाघात.
🛑”आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि.”-एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप.👉 म्हणाले, “मी साक्षीदार.”
🛑फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला
दादा भुसे गोट्या खेळतात का? सुषमा अंधारेंच्या भाषणातील ठळक १० मुद्दे
🛑रावण आमचा देव.- दहणाला विरोध. 👉आदिवासी समाजाची भूमिका 👉घुग्घुसमध्ये तणावाची स्थिती.- दंगल नियंत्रण पथक दाखल.
🛑देशात नवीन आजाराचा कहर!
संपूर्ण गाव गूढ तापाच्या विळख्यात.-
500 हून अधिक आजारी
मुंबई:- प्रतिनिधी.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण जरांगे पाटलांना धन्यवाद देत असल्याचं नमूद केलं. “मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजूदारपणे त्यांनी आंदोलन चालू ठेवलंय. आज त्यांनी धनगरांनाही साद घातली आहे ही चांगली गोष्ट केली. जालन्यात हे आंदोलन शांततेत चालू होतं. जसं जालियनवालामध्ये घुसून इंग्रजांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवलीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर सरकारने पाशवी हल्ला केला होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जखमी आंदोलकांना भेटायला गेले असताना दिसलेलं चित्र मेळाव्यात सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, ५७ वर्षे झाली. पण आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना मोडीत काढून परंपरा चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्षे सुरूच ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा. हा मेळावा या संस्कृतीचं विराट दर्शन आहे. आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला. रावण सुद्धा शिवभक्त होता. पण तो शिवभक्त असूनही रामाला त्याचा वध करावा लागला. कारण रावण माजला होता.
आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. तो धनुष्यबाणही यांनी चोरला आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका पेटवली होती. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी इथं शिवसैनिक जमला आहे. सध्या क्रिकेटचा मौसम आहे. वर्ल्डकप सुरू आहे. मधेमधे जाहिराती असतात. काही जाहिराती पाठ होतात. एक जाहिरात अक्षय, अजय देवगण, शाहरूख खान आमच्याकडेही तिघेही बसलेत. त्यांना कमला पसंत आहे, यांना कमळा पसंत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.
🛑”आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि.”-एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप.👉 म्हणाले, “मी साक्षीदार.”
मुंबई – प्रतिनिधी.

आझाद मैदानातून दसरा मेळाव्याला सुरुवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तोफ डागायला सुरुवात केली. “५० खोके, एकदम ओके” असा आरोप शिंदे गटावर झाला आहे. या टीकेवरून त्यांनी ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्ताचं नातं सांगण्याऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर त्यांनी शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. पण ५० कोटी द्यायला बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यामुळे ठाकरेंनी निर्लज्जपणे पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांवर आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता. या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले.”
“मी सांगितलं यांचं प्रेम बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन”, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
“आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर यात आश्चर्य वाटालयाल नको. त्या पापात आपण सहभागी नाही हे समाधान आहे. बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना हे डोक्यावर घेऊन फिरत आहेत”, अशीही टीका त्यांनी केली.
🔴फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला
दादा भुसे गोट्या खेळतात का? सुषमा अंधारेंच्या भाषणातील ठळक १० मुद्दे
मुंबई – प्रतिनिधी.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसे यांच्यावर कडाडल्या.त्यांनी नाशिक ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारला घेरले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस, दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे वाचा..
🔴सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक १० मुद्दे
हा महाराष्ट्र ड्रग्स मुक्त झाला पाहिजे. हा महाराष्ट्र नाश मुक्त झाला पाहिजे. 10 ऑक्टोबरला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केलं. नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडतय तर पालकमंत्री काय करतायत. नाशिकला एवढ्या कोटींचा साठा मिळत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळतोय का, असे म्हणत दादा भुसेंवर टीका केली.
दहा दिवसांपासून मला नोटीस पाठवणारे मला अंधारात सेटलमेंटची भाषा करतायत. नाशिकचा अमोल परदेशी पुण्याच्या एकीला फोन करतो. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू, अशी ग्रामीण भागात म्हण आहे.

दबाव आणतात घाबरवतात, अब्रुनुकसानीचा दावा टाकायचा… ज्यांना महाराष्ट्राच्या अब्रुची जाण नाही, ते मला नोटीस पाठवणार का ? मला नाही अब्रु अन् मी कशाला घाबरु, अशी गावाकडे म्हण आहे.. यांचेही असेच काम आहे..
हे धमकावत राहतात आणि फडणवीस म्हणतात सर्वांचे आवाज बंद होतील. गृहमंत्री साहेब ललित पाटील आमचा होता अशी बदमाशी का करतायत? शिवतीर्थावरून विचारते आहे की 9 महिने त्याला कोणता आजार होता की त्याला ससूनला ठेवले ? गरोदर महिला सोडून कोणालाच एवढे दिवस ठेवत नाहीत.
पक्ष, संघटना, जात, धर्म याचा कोणताच प्रश्न नाही. महाराष्ट्रातील कोणताच तरुण व्यसनाधीन झाला नाही पाहीजे, अशी माझी भूमिका आहे..
काही जण देवेंद्र फडणवीस यांना चाणक्या म्हणतात… पण मला हे पटत नाही.. शरद पवार आणि बाळासाहेबांनी मोठ्या नेत्यांना घडवले.. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवले… त्यांनी फक्त जमवले. देवेंद्र फडणवीस मोठ्या महाशक्तीचे नेते आहेत. तुम्ही लोकांना जमवले नाही, तोडले. पंकजा मुंडे, खडसे यांना संपले.. आता चंद्रकांत पाटील यांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तुमच्याकडे सगळे काही असताना तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादीमधून उचलेगिरी का करतात ? तुमचा मोठा पक्ष अन् संघटना आहे तर आमच्याकडील रेडीमेल माल का उचलता… तुम्ही कसले चाणक्य ?
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला आहे. महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचे खाऊन मराठी लेकींना धमकावण्याचे काम एका अमराठी माणसाने केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगावे.
सुषमा अंधारे म्हणजे अंगार भंगार नाही, शिस्तीत राहा, उडू नको… चळवळीतून आलेली मुलगी आहे. धमक्यांना घाबरत नाही.
सुषमा अंधारे चळवळीतून आली आहे, बाळासाहेबांचं बाळकडू आहे.. आमदार, कोट्यवधीशांना तुम्ही नडला असाल पण मध्यमवर्गीयांना कधी नडला नसाल.. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राचा लढा देते आहे, फडणवीस तुम्ही फेल ठरले आहात.. सरळ सरळ प्रश्नांची उत्तरे द्या.
रावण आमचा देव.- 🛑 दहणाला विरोध. 👉आदिवासी समाजाची भूमिका 👉घुग्घुसमध्ये तणावाची स्थिती.- दंगल नियंत्रण पथक दाखल.
चंद्रपूर – प्रतिनिधी.
रावण आमचा देव असल्याने कुठल्याही परिस्थितीत रावण दहन करू नये, रावणाची प्रतिमा निर्माण करू नये अशी भूमिका आदिवासी बांधवानी घेतली. यामुळे घुग्घुस शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले. दंगा नियंत्रक पथकाला यावेळी पाचरण करण्यात आले. दसरा व धमचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
घुग्घुस शहरात सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आदिवासी समाज बांधवांनी रावण दहनासाठी प्रतिमेचे निर्माण करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक आसिफराजा व पोलीसदलाने समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले. शांती व सुव्यवस्था बिघडू नये याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत आहे. आज शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचीही रॅली निघणार असून विजयादशमी असल्याने पोलिसांवर या घटनेचा प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे.
शहरातील आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला असून रावण दहन केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्घुस शहरात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. तर बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही, असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, दंगा नियंत्रण पथकसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये, अशी आदिवासी समाजाची मागणी आहे.
🛑देशात नवीन आजाराचा कहर!
संपूर्ण गाव गूढ तापाच्या विळख्यात.-
500 हून अधिक आजारी
नवी दिल्ली – वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षात अनेक नवीन आजारांनी माणसाला हैराण करुन सोडले आहे. कोरोना विषाणूने तर जगभर कहर केला होता. आता अशाच एक घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद गावात गूढ तापाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असून 500 हून अधिक लोक या तापाच्या विळख्यात आहेत.
🟥प्रत्येक घरात आजारी लोकांची संख्या वाढत असून त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण या तापाच्या विळख्यात आहेत. वाढते आजार पाहून आरोग्य विभागाचे पथकही खडबडून जागं झाले आहे. प्रशासनाकडून लोकांना औषधे देताना खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
🛑मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदीनगर, गाझियाबादच्या भानेरा गावात गूढ तापामुळे सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले, तेथे डझनभर लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. जवळपास दररोज 100 हून अधिक लोक हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये पोहोचत आहेत. 20 सप्टेंबरच्या सुमारास गावातील काही लोकांना ताप आला होता. त्यानंतर ही साथ संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.
🟥आरोग्य विभागाकडून डेंग्यू व विषाणूची तपासणी
आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू आणि विषाणू संसर्गाच्या लोकांची तपासणी केली. मात्र, हा आजार कसा पसरला आणि लोकांना आपला जीव का गमवावा लागतोय? हे डॉक्टरांच्या टीमने अद्याप सांगितलेले नाही. गावाशेजारी काही तलाव असून तेथे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचे समजते. तलावातील पाणी कुजल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरल्याचे बोलले जात आहे.
🛑अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आरोग्य विभागाचे पथक गेल्या तीन दिवसांपासून गावात तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गावात स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. आरोग्य जिल्हा देखरेख अधिकारी डॉ आर के गुप्ता यांनी सांगितले की सर्व काही नियंत्रणात आहे आणि निष्काळजीपणा प्रकरणी ग्यासपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ अन्सारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
