HomeUncategorizedआरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय. मुख्यमंत्री 🛑दिव्यांगांसाठी ६६७...

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय. मुख्यमंत्री 🛑दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता.- दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे🛑500 रुपयांत सिलिंडर, इंटरनेट, प्रवास मोफत, मुलींच्या लग्नावेळी 10 ग्रॅम सोने.- तेलंगणात काँग्रेसने केला जाहिरनामा प्रसिद्ध

🛑आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय. मुख्यमंत्री
🛑दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता.- दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🛑500 रुपयांत सिलिंडर, इंटरनेट, प्रवास मोफत, मुलींच्या लग्नावेळी 10 ग्रॅम सोने.- तेलंगणात काँग्रेसने केला जाहिरनामा प्रसिद्ध

नवी दिल्ली – वृत्तसंस्था.

तेलंगणामध्ये पुढील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने रविवारी 15 ऑक्‍टोबर रोजी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर, मुलींना लग्नाच्या वेळी दहा ग्रॅम सोने, एक लाख रुपये रोख आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट देण्यासारखी आश्वासने दिली आहे.तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या मॅनिफेस्टो कमिटीचे अध्यक्ष डी श्रीधर बाबू म्हणाले की, सध्याचे विद्यमान सरकार कल्याण लक्ष्मी आणि शादी मुबारक योजना चालवत आहे.
या योजनांतंर्गत, तेलंगणातील रहिवासी असलेल्या आणि लग्नाच्या वेळी 18 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना, ज्यांची कौटुंबिक उत्पन्न प्रती वर्ष 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशांना 1,00,116 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. परंतु आम्ही 1 लाख रुपयांच्या रोख व्यतिरिक्त, पक्षाच्या “महालक्ष्मी’ हमी अंतर्गत सोने देऊ. याशिवाय महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत आणि महिलांना राज्य परिवहन बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन दिले आहे.
श्रीधर बाबू म्हणाले की, मुलींना एक तोळा सोने (दहा ग्रॅम) दिले जाईल. या सोन्याची किंमत सुमारे 50,000 ते 55,000 रुपये असेल. याशिवाय जाहीरनामा समितीच्या एका सदस्याने सांगितले की, पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेटचाही समावेश करण्याची योजना आखली आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही इंटरनेट सेवा पुरवठादारांशी बोलू आणि त्यासंबंधी निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत बीआरएसचे प्रवक्ते श्रावण दासोजू यांना विचारले असता ते म्हणाले की, कर्नाटकचे कॉंग्रेस सरकार निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करू शकत नाही, ते काहीही आश्वासन देऊ शकतात. परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गरिबांसाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि योजना तयार करण्यात आणि अंमलात आणण्यात अग्रेसर आहेत. ज्याची स्वतंत्र भारतात इतर कोणत्याही राजकीय पक्षाने कल्पनाही केली नव्हती.

🛑आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय.- मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी.
( पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

मुंबई:- प्रतिनिधी.

परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
दरम्यान,बुधवारी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरिक्षकांपैकी ९१ टक्के जणांना तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.
परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसीत केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाईन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.
१६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी १०० जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, ३५ जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, १५ जणांना तृतीय पसंती क्रमानुसार तर १६ जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक तीव्र उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

🛑दिव्यांगांसाठी ६६७ पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकाने खरेदीस मान्यता.- दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ( मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न. )

मुंबई :-प्रतिनिधी

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली, दरम्यान, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यामाध्यमातून त्यांची सेवा करण्याकरिता कार्यरत दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक, वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली, त्यावेळी महामंडळाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन, दिव्यांग वित व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींसाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी फरिदाबाद येथील कंपनीकडून करण्यात येणार असून जानेवारी २०२४ पर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांना याचे वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. संबंधित कंपनीने लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे ही वाहने सुधारित करुन द्यावीत, यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा शिवाय लाभार्थी निवडीची कार्यवाही लवकर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दिव्यांग लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी नवीन पोर्टल

दिव्यांग बांधवांच्या कल्याणाच्या विविध योजनांची माहिती, लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी वेब पोर्टल तयार करुन जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबर रोजी ते सुरु करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

रोजंदारी, बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध कार्यालयांमध्ये रोजंदारी तत्त्वावर आणि बाह्य यंत्रणेद्वार कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सहायक, लिपिक-टंकलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वाहनचालक, लिपिक-टंकलेखक/वसुली निरीक्षक आणि शिपाई या पदावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात अडीच हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.

दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मिती प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश

दिव्यांग कल्याण विभागातील पदनिर्मितीच्या प्रस्तावाला वित्त, नियोजन विभागाने तातडीने मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. बैठक सुरु असतानाच वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना दूरध्वनीवरुन हे निर्देश दिले.लवकरच दिव्यांग कल्याण आयुक्तांचे पद भरण्यात येणार असल्याचे सांगून दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजनासाठी प्रति जिल्हा २५ लाख रुपये निधी देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नवीन शाह यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या पदसिद्ध संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बैठकीत महामंडळाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.