मणिपूरात कुकी आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड – गुप्तांगांची, सन्मानाची विटंबना. निषेधार्थ आजरा तहसीलदारांना निवेदन
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील पुरोगामी संघटनांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन मणिपूर सह विविध घटनेबाबत विविध मागणीचे निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१- बेडग ता मिरज येथील आंबेडकरी समाजाने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन उभारलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान तोडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा मंत्रालयाच्या दिशेने भर पावसात निघालेल्या लॉंग मार्चला पाठींबा आणि त्यांना तातडीने न्याय मिळणेबाबत २- मणिपूर येथील कुकी आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड काढून त्यांच्या गुप्तांगांची, सन्मानाची विटंबना केली जात असल्याचा व्हिडिओ, फोटो समाजमाध्यमावर फिरत आहेत. ह्या लज्जास्पद घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि हे कृत्य करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा करणेबाबत.
गेले अनेक दिवस या देशात दलित, आदिवासी, मुस्लीम, अल्पसंख्याक आणि स्त्रियांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. आपल्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आंबेडकरी जनतेने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन स्वागत कमान उभी केली होती. ही स्वागत कमान कांही जात्यांध लोकांना खुपत होती. त्यांच्या दबावाखाली येऊन ही स्वागत कमान प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली. ज्यांनी पाडली त्यांच्याकडून न्याय मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने बेडग येथील आंबेडकरी जनतेने भर पावसात बायका पोरे, म्हातारे कोतारे, लहान मुलांसह गाव सोडून मंत्रालयाच्यादिशेने लॉंग मार्च सुरु केला आहे. आजही या देशात जात मानसिकता किती विखारी पध्दतीने काम करते हेच या घटनेवरून दिसून येते. अशा या जातीयवादी प्रवृत्तीचा आणि त्यांच्या दबावाखाली येऊन स्वागत कमान तोडणाऱ्या प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. या लॉंग मार्चची दखल घेत स्वागत कमान पडणाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आम्हालाही त्यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल याची नोंद घावी. दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांच्यावरील अत्याचाराच्या घटनाबरोबर स्त्रियांच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मणिपूर राज्यात गेले महिने दोन महिने जातीय आणि धार्मिक विव्देषातून मोठ्या प्रमाणात जातीय, धार्मिक दंगलीचा आगडोंब उसळला आहे. तिथले सामाजिक जीवन अस्थिर बनले आहे. अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. दोन दिवसापूर्वी तर तिथे कहरच झाला. अख्या देशाने शरमेने मान खाली घालावी अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. कुकी आदिवासी जमातीतील दोन स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यातील एका स्त्रीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारी झुंडीला अडवणाऱ्या तिच्या भावाला ठार मारण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांची नग्न करून काढलेली धिंड आणि त्यांच्या गुप्तांगाशी केली गेलेली छेडछाड याचे व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर फिरवण्यात आले. ही घटना कोणत्याही संवेदनशील माणसाला चीड आणणारी आहे. या घटनेतील सर्वच गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे वरील दोन्ही घटनांचा आम्ही आजरा तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी व्यक्ती आणि संघटना तीव्र निषेध करीत असून या दोन्ही घटनातील गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आम्हालाही आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदन म्हटले आहे या निवेदनावर कॉ संपत देसाई प्रा.राजा शिरगुप्पे डॉ नवनाथ शिंदे, संजय घाटगे, कृष्णा सावंत, भीमराव पुंडपळ, संग्राम सावंत, दशरथ घुरे,युवराज जाधव, प्रकाश, मोरुस्कर, निसार मुल्ला,बाळू जाधव, नारायण भडांगे यांच्या सह्या आहेत
