…पाऊसच पाऊस..!
कणकवली तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस ; अनेक रस्ते पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत
कणकवली/विनोद जाधव
जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तसेच शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीला पूर आल्याने लगतच्या
भागांना पुराचा वेढा पडला. जानवली नदीला पूर आल्यामुळे आचरा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. गडनदीवरील केटी बंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी जात होते. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी – नाले तंडुब झाले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यासह जोरदार तडाखा दिला.
परिमाणी जानवली व गडनदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आचरा रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे याठिकाणी असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले.
गडनदीवरील केटी बंधारे ओव्हर फ्लो झाले. मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे मोठी ओंडके बंधाऱ्यात अडकून आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे हे ओडके बंधाऱ्याला आदळत असल्याने बंधाऱ्या ला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओडके काढून टाकण्याची मागणी होत आहे.
