म्हैस खरेदीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा. गोकुळ संचालिका श्रीमती रेडेकर
आजरा. – प्रतिनिधी.
म्हैस खरेदी करीता आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने असलेली बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त दुध उत्पादकांनी म्हैस खरेदी करावी त्यातून स्वतःची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या वाटंगी ता. आजरा येथिल रवळनाथ दुध संस्थेच्या सभागृहात झालेल्या आनंदराव पाटील चुयेकर म्हैस दुधवाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रम अंतर्गत झालेल्या बैठकीत बोलत होत्या. प्रारंभी गावातील सर्व दुध संस्थांच्या वतीने श्रीमती रेडेकर यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. संकलन विभागाचे उपव्यवस्थापक के.डी. आमते यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी बोलताना श्रीमती रेडेकर म्हणाल्या गोकुळ दुध संघाच्या म्हैशीच्या दुधाला मुंबई व पुणे बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासही दुध कमी पडत आहे. त्याचबरोबर गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेतेमंडळींनी वीस लाख लीटर दुधाचा संकल्प केला आहे. या गोष्टी प्रत्यक्षात आमलात येण्याकरीता नव्याने म्हैस खरेदी करणे गरजेचे आहे. त्याकरीता सभासदांचे प्रभोधन करून व त्यांना म्हैस खरेदीसाठी असणा-या विविध योजनांची माहीती देवून म्हैस खरेदीसाठी तयार करण्याचे काम सुरू आहे. या बरोबरच वांझ जनावरांना दुधात घेण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच गोकुळच्या वतीने वासरू संगोपन योजना ही प्रभावीपणे राबवीली जात आहे. या सर्व योजनांच्या मधून प्रयत्न केले जात आहेत. सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी या योजनेमधून दुग्ध व्यवसायात उतरल्यास त्यांना उज्वल भविष्य आहे. या व्यवसायाकडे पारंपारीकपणे शेतीला जोड धंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पाहील्यास यातून प्रचंड नफा मिळू शकतो. दुध उत्पादकांनी जास्तीत जास्त दुध देणारी संकरीत जनावरे खरेदी करावीत. या करीता हरीयाना व गुजरात येथून खरेदी करण्यात येणा-या म्हैशींसाठी संघाकडून तीस हजार रूपये अनुदान दिले जाते. त्याचा लाभ सर्व दुध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी जनावरांच्या विविध आजार, त्यासंबंधी औषध उपचार व प्रतिबंधात्मक लस याविषयीची माहिती दिली. यावेळी शिवाजी गिलबीले व महेश कोले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विजय देसाई, बाबुराव गिलबीले, सुरेश शिंगटे, एकनाथ गिलबीले, संतोष बिर्जे, किरण पाटील, विजय पवार, विश्वास चव्हाण, उदय पाटील, विनायक पाटील यांच्यासह गावातील सर्व दुध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व उत्पादक मोठया संख्येने उपस्थित होते.
