जनतेने आगामी लढाईसाठी आम्हाला आर्शिवाद द्यावा. – शिवसेना पक्षप्रमुख. उध्दव ठाकरे.
यवतमाळ.- प्रतिनिधी.
पोहरादेवी येथे येऊन आई जगदंबेचे दर्शन घ्यावे, असे खूप दिवसापासून माझ्या मनात होते आणि आज तो योग आला. आज मी फक्त एवढेच म्हणेल,‘आई जगदंबेसोबतच जनतेनेही आम्हाला आगामी लढाईसाठी आर्शिवाद द्यावा, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख ९ जुलै रोजी वाशीम – यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
उद्धव ठाकरे यांचे वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, सेनेचे जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, रवि पवार, गोपाल पाटील यवतकर, डॉ. राजीव विल्हेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी वाईगौळ येथे स्वागत केले. स्वागताचा स्वीकार करून उद्धव ठाकरे पोहरादेवी येथे पोहचले.पोहरादेवी येथे त्यांनी सर्वप्रथम आई जगदंबाचे दर्शन घेतले. त्यानंतर संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. संत सेवालाल महाराज समाधी स्थळाच्या आवारात महंत कबीरदास यांनी बंजारा समाजाचा पारंपारीक कवलपट्टा, रुमाल, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे संत रामराव महाराज यांच्या आश्रमात पोहचले. या ठिकाणी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी फेटा, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. सोबतच महंत बलदेव महाराज यांच्यासोबत चांदीचे कडेही उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.त्यानंतर उद्धव ठाकरे संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या समाधीस्थळावर आले. यावेळेस महंत शेखर महाराज यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळाचे पूजन केले. महंत शेखर महाराज यांनी या ठिकाणी अरदास म्हटली. त्यानंतर महंत संजय महाराज आणि उद्धव ठाकरे यांनी नगारा वादन करीत आपल्या विदर्भ दौर्याचा प्रारंभ झाल्याचे संकेत दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेत्ते रावसाहेब दानवे, खासदार अरविंद सांवत, खासदार विनायक राऊत, मिलींद नार्वेकर, महंत संजय महाराज, भक्तराज महाराज, बलदेव महाराज, गोपाल महाराज, स्वर्ण महाराज, माजी विज मंडळ सदस्य अनील राठोड, भोला राठोड, रवी पवार विशाल राठोड आदीसह वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
