‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकरांविरुद्ध एक हजार ८३५ पानांचे दोषाराेपपत्र.- पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका
पुणे :- प्रतिनिधी.
डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात एक हजार ८३५ पानांचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. डाॅ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर साठ दिवसांच्या आत त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश कचरे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एटीएसच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र एक हजार ८३५ पानांचे आहे.
शासकीय गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरविल्याच्या आरोपावरून कुुरुलकर यांना अटक करण्यात आली असून,याप्रकरणी एटीएसकडून मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात कुरुलकर यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. शासकीय गुपिते अधिनियम १९२३ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुलकर यांना झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील महिलेने मधुमोहजालात (हनी ट्रॅप) अडकवून त्यांच्याकडून लष्करातील गोपनीय माहिती घेतली. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याचे एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे.
कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाइल संच, इलेक्ट्राॅनिक साहित्याचे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्यांनी संपर्क साधण्यासाठी वापरलेला क्रमांक, पुरवलेल्या माहितीत छेडछाड केल्याचे उघडकीस आले आहे. बंगळुरूतील हवाई दलातील कनिष्ठ कर्मचारी निखिल शेंडे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. कुरुलकर यांनी झारा दासगुप्ताचा मोबाइल क्रमांक ब्लाॅक केला होता. त्यानंतर झारा दासगुप्ता नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील महिलेने शेंडे यांच्या माध्यमातून कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला होता. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाइल संच, लॅपटाॅप, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे विश्लेषण करण्यात आल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
