गोकुळच्या सोयी-सुविधांचा लाभ घ्या : अंजनाताई रेडेकर.- गोकुळ संचालिका ( खेडे येथे स्वाभिमानी दूध संस्थेच्या नामफलकाचे अनावरण.)
आजरा .- प्रतिनिधी.

दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळ दूध संघ विविध योजना राबवित असून दूध उत्पादकांना सर्व सोयी-सुविधा पुरवित आहे. या सुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा. असे आवाहन अध्यक्ष स्थानावरून गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले. खेडे . ता. आजरा येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वाभिमानी सहकारी दूध संस्थेला नोंदणी मिळाल्यानंतर आयोजित नामफलक अनावरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी संस्थेच्या नाम फलकाचे अनावरण श्रीमती रेडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रकाश सावरतकर यांनी प्रास्ताविकात संस्था स्थापनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. ८ सप्टेंबर २०२१ रोजी संस्थेचा प्रस्ताव सादर केला होता. पण गावातील इतर संस्थांच्या चालकांनी ही संस्था होऊ नये यासाठी कसे प्रयत्न केले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई पर्यंत कशा प्रकारे तक्रारी दाखल केल्या याची माहिती उपस्थितांना दिली. मात्र गेल्या पावणेदोन वर्षांच्या काळात ज्या त्या टप्यावर मेटलेल्या भल्या माणसांनी आम्हाला मदत केली. त्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोकुळ संचालिका श्रीमती रेडेकर म्हणाल्या, अनेक समस्यांना तोंड देत ही संस्था स्थापन झाली आहे. सध्या संस्थेकडे प्रतिदिन १०० लीटर दूध संकलन होत असले तरी भविष्यात यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न संचालक मंडळ व दूध उत्पादकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. गोकुळला म्हैस दूध पुरवठा करण्यात आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुका अग्रक्रमावर आहे. आणखी दूध उत्पादन वाढविण्यासाठी गोकुळ प्रयत्नशील आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी म्हैस खरेदीसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. दूध व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या मंडळींना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जात आहे. स्वाभिमानी दूध संस्थेच्या उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
दूध उत्पादनाकडे व्यवसाय म्हणून पहावे, कोणी दूध उत्पादक गोठा सुरू करणार असेल तरी त्यांना सहकार्य केले जाणार आहे. गोकुळ व जिल्हा बँकेच्या माध्यमातून म्हैस खरेदीसाठी राबविण्यात येत असलेली योजन, गोकुळकडून दिले जाणारे अनुदान यासह विविध योजनांची माहिती रेडेकर यांनी दिली. संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही श्रीमतीर रेडेकर यांनी दिली.
गोकुळच्या वासरू संगोपन योजनेचे अनुदान प्राप्त केलेल्या सुमन पांडूरंग आर्दाळकर व नारायण आर्दाळकर यांना अनुक्रमे दहा हजार व पाच हजार रूपयांच्या अनुदानाचे धनादेश रेडेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी शामराव मांगले, महेश आर्दाळकर, रवींद्र जाधव, विजय पाटील, बाळासाहेब आर्दाळकर, संजय शिंदे, नारायण चौगुले, शिवाजी तर्डेकर, सुरेश कांबळे, माजी सरपंच रूपाली आर्दाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्या पद्मजा पाटील, माया गोडसे, मनोहर सावरतकर, रवींद्र कातकर, सदाशिव पाटील, नितीन गायकवाड यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, गोकुळचे पर्यवेक्षक दयानंद जाधव, सचिव पांडूरंग आर्दाळकर, दूध उत्पादक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सुनील पाटील यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.
