शिवसेनेचे आज वरळी ‘एनएससीआय’ डोम येथे राज्यव्यापी शिबीर, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन.
मुंबई.- प्रतिनिधी.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यभरातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे भव्य शिबीर उद्या रविवार १८ जून रोजी वरळी ‘एनएससीआय’ डोम येथे होत आहे. या शिबिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे. या शिबिरासाठी राज्यभरातून शिवसेना पदाधिकारी मोठय़ा संख्येने येणार आहेत. या शिबिरासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर आहे.
राज्यात ‘बेकायदा’ मिंधे सरकार आल्यापासून वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे जनता हवालदिल झाली आहे. अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून आत्महत्या वाढल्या आहेत. लोकशाहीची गळचेपी सुरू असून ‘ईडी’ सरकारकडून अन्यायकारक आणि सुडाचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आगामी काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा पह्डण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना दिशादर्शक मार्गदर्शन करतील. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पहिल्या सत्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेल्या कोविड लढय़ाची ध्वनिचित्रफीत दाखवली जाईल. यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
असे राहणार दुसरे सत्र
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात संगीतकार राहुल रानडे आणि सहकलाकार ‘शिवसेनेचा पोवाडा’ सादर करतील. यानंतर साईनाथ दुर्गे माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर माहिती देणार आहेत. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांची भाषणे होणार असून सायंकाळी ४ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
