म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही.- जयंत पाटलांचा घणाघात. 👇दिवसभरातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पहा..या आत्ताच्या बातमीत – महाराष्ट्रातील सद्याचे राजकीय वातावरण अस्थिर असल्याचे मान्य केल्यास खरेच निवडणुका जाहीर होतील का, हा महत्वाचा प्रश्न. – यावर आता सत्ताधारी गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विशेष – प्रतिनिधी.
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून जे 40 आमदार फुटून गेले आहेत, त्यांच्याबरोबर आता लोकं राहिलेली नाहीत, प्रत्येक गोष्ट त्यांना अडचणीची ठरु लागली असल्याची टिकाही यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यभर पिकांचं नुकसान झालं पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव सोडून बाहेर कठेच गेले नाहीत, असा प्रश्न केल्यावर जयंत पाटील म्हणाले की, गुलाबराव पाटलांना बाकीचे उद्योग करण्यासाठी त्यांना वेळ पाहिजे, बाकीची बरीच कामं त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे अवकाळी पावसात संकटात पडलेल्या शेतकऱ्यांकडं पाहायला त्यांच्याकडं वेळ नाही.
आम्ही विधानसभेतही याच्यावर आवाज उठवला. सरकारकडून त्या शेतकऱ्यांना मदत करायची घोषणादेखील केलेली नाही. यापूर्वी ज्या घोषणा झाल्या त्याचे पैसेही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अवकाळी पावसात आणि यापूर्वीच्या संकटात सापडलेला शेतकरी या सरकारवर प्रचंड नाराज असल्याचं यावेळी जयंत म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेतून फुटून गेलेल्या 40 जणांची आता अडचण झाली आहे. त्यांना खोक्यांची गोष्ट तर प्रचंड अडचणीची वाटत आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी अनेक आमदार काहीही बोलत आहेत. त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेनं काय करायचं हे ठरवलेलं आहे.
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना दिलेल्या इशाऱ्यावरुन प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्येच ते सांगितलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर त्यांची ती प्रतिक्रीया आहे. आमच्या भूमिकेचा त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची ती प्रतिक्रिया आहे.
त्याचवेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरुन प्रश्न केला असता जयंत पाटील म्हणाले की, अलिकडे कोणी कोणालाही भेटू शकतं, त्यामुळे त्याच्यावर लगेच प्रतिक्रीया द्यावी असं मला वाटत नाही, असं म्हणत त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.
मंत्री सावंतांचा गौप्यस्फोट ! बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने; मी घेतल्या दीडशे बैठका.
तानाजी सावंत: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्य सत्तांतरही घडवून आणले. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचे आरोप त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केले गेले. आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट करत यावरच शिक्कामोर्तब केले आहे.
सावंत म्हणाले, बंडासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी तब्बल दीडशे बैठका केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात केली, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांत भाषणात त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
ते पुढे म्हणाले, या बंडासाठी मी फडणवीस यांच्याबरोबर जवळपास दीडशे बैठका घेतल्या. तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदारांना बंडासाठी तयार करण्याचे कामही करत होतो. विशेष म्हणजे, मी या सगळ्या गोष्टी सांगून करत होतो कोणतीही गोष्ट कधी लपूनछपून केली नाही. मंत्री सावंतांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.

30 डिसेंबर 2019 रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर पहिल्यांदा 3 जानेवारी दरम्यान मी आणि सुजितसिंह ठाकूर यांनी फडणवीस यांच्या आदेशाने बंडखोरी करत जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आणली. तसे पाहिले तर धाराशिव जिल्ह्यातूनच बंडाची सुरुवात झाली. आम्ही तेव्हापासूनच बंडाचा झेंडा फडकावला होता.
दरम्यान, मंत्री सावंत यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून भाजपवर जे आरोप होत होते ते कुठेतरी खरे असल्याचे दिसून येत आहे. कारण, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. आता तर खुद्द सरकार पडल्यानंतर नव्या सरकारमधील मंत्रीच थेट फडणवीस यांच्या आदेशाने बंड केल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे हे बंड कुणाच्या आशिर्वादाने केले गेले हे आता उघड झाले आहे.
तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?
धाराशिव : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi)सत्तेत आल्यानंतर 2019 च्या पुढे सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या. मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम सुरु होतं. हे सांगून करत होतं. झाकून करत नव्हतो, उघड माथ्यानं आपण करत होतो, असं ठणकावून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी ते म्हणाले की, तुम्ही ऐकलं असेल की, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. ते धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्याचे आरोग्यमंत्री यांनी धाराशिवध्ये उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 30 डिसेंबर 2019 ला महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. 3 जानेवारीच्या दरम्यान मी स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने पहिल्यांदा बंडखोरी करुन धाराशिवच्या जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन केली. त्यावेळीच बंडाचं निषाण फडकावलं होत. तेवढ्यावरच न थांबता ज्यांना इशारा द्यायचा होता त्यांना त्याचवेळी दिला होता असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
तानाजी सावंत म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये जनतेनं शिवसेना-भाजप युतीला 180 च्या पुढे जागा निवडून दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे तत्त्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून आम्ही संपूर्ण राज्यभर मतं मागितली. त्यानंतर या जनतेनं शिवसेना-भाजपला कौल दिला. सत्ता स्थापनेसाठी होकार दिला, ही सत्यस्थिती आहे.
त्यानंतर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राचे जानता राजा, संपूर्ण भारत देशाला वेड लावलं होतं, त्यांना माहिती होतं की यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकल्याशिवाय ही युती काय तुटणार नाही. असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यानंतर 2019 मध्ये जे चित्र तुम्ही पाहिलं, त्या चित्रातला आमचे तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सल्ला देणारा महाराष्ट्रातला पहिला शिवसैनिक आणि आमदार तानाजी सावंत होता. मी त्यांना त्याचवेळी सांगितलं होतं की, साहेब यांच्या नादाला लागू नका, यांच्या नादाला लागाल तर आत्मघात ठरेल, पक्षाचं वाटोळं होईल, हा निर्णय घेऊ नका. कदाचित हा सल्ला दिल्यामुळे तत्कालिन आमच्या पक्षप्रमुखांनी मला त्यावेळच्या मंत्रिमंडळातून बाजूला केलं.
भगतसिंह कोश्यारींकडून महापुरुषांचा अवमान? न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई : राज्याचे (Maharashtra)माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना (Bhagatsingh Koshyari)मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court)दिलासा मिळालेला आहे. भगतसिंह कोश्यारींचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, समाजप्रबोधन करण्याचा होता, अशी टिपण्णी करत छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारींनी केलेली वक्तव्य ही इतिहासाचं विश्लेषण करणारी आहेत. त्यातूनच राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दिसून येतो. तसेच त्यांचा हा सामाजिक दृष्टीकोन आत्मसात आणि आचरणातही आणावा हा हेतू होता त्यांच्या वक्तव्यांमध्ये होता.
त्यामुळे भगतसिंह कोश्यारींनी केलेली वक्तव्य ही कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार कारवाईस ते पात्र ठरत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
रमा कटारनवरे यांनी अॅड.अमित कटारनवरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्याबद्दल चुकीचं विधानं केली होती.
म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायलयाकडून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
भाषा संजय शिरसाटांना भोवणार? रूपाली ठोंबरेचा इशारा
पुणे : – संजय शिरसाट हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे, जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केले.
याउलट संजय शिरसाट आत्ता जिथे आहेत तिथे असणारे पुरुष राजकारणी हे कायम महिलांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत बोलतात मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील. तर तिथे असणाऱ्या महिला या कायम नंगट, हरामखोर, थोबडवून काढीन, सटवी, चपलाने मारेल, दांडा, ढुं* अशी गलिच्छ भाषा आणि शब्दप्रयोग करतात. त्यामुळे शिरसाट यांना चांगलं बोलायची आणि चांगलं ऐकायची मुळात सवयच नाही.
शिरसाट जेव्हा लफड्यांची वगैरे भाषा वापरतात, तेव्हा ते त्यांची वैचारिक लायकी काय आहे हे जगाला दाखवतात. शिरसाट यांची संभाजीनगर मधली ख्याती अशी आहे की सिरसाठ यांना कोणीही घरात निमंत्रण देत नाही, कारण शिरसाटांची नजर इतकी पापवासनेने भरलेली असते की घरातल्या लेकी बाळींना शिरसाठानी भेटावे असे कुणालाही वाटत नाही.
मुळात शिरसाटानी स्वतःच्या अंतरंगात जरा डोकावून बघावे आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यावी .
१) संभाजीनगर मध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते?
२) व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटाकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाठ यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती?
3) अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटानी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते.
4) दोन अडीच महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्स ने संभाजीनगर वरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ?
शिरसाट माझं तोंड उघडू नका आणि आता शेवटचा प्रश्न सुषमाताई अंधारे या रामा इंटरनॅशनल ला उतरतात की, ताज हॉटेल ला उतरतात ही ओबेराय हॉटेलला उतरतात, त्या लाखो शिवसैनिकांच्या लेक आणि बहीण म्हणून त्यांच्या काळीज कप्प्यात राहतात. हा मिंदे गटातल्या गद्दारांचा प्रश्न असू शकत नाही. त्यांच्या राहण्या खाण्याची काळजी आणि खर्च करण्यासाठी त्यांचा पक्ष अत्यंत खंबीर आहे. मिंधे गटातल्या गद्दारांनी फार फार तर खोक्यांमधून मिळालेल्या पैशांनी गुवाहाटीच्या सहली कराव्यात आणि आयत्या पिठावर रेगोटे मारत आहेत, लोकांच्या कष्टाच्या घामातून मिळालेल्या पैशावर ऐश करत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असे म्हणत बसावे.
शिरसाट हा तुम्हाला अत्यंत आपुलकीचा सल्ला वजा इशारा आहे. सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या कायद्याने चालणाऱ्या आणि शून्यातून स्वतःचे ओळख उभी करू पाहणाऱ्या महिलेला एकाकी समजून जर तुम्ही गलिच्छ पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ महाराष्ट्रातल्या तमाम जिजाऊ सावित्रीच्या लेकींशी आहे. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे दिला.
राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी काही जणांनी साक्री विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी केली. येथे पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीकडेच असावा अशी मागणी करण्यात आली.
त्यावर पाटील म्हणाले, की येथे आधी पक्ष संघटना बळकट करणे गरजेचे आहे. तेव्हा आधी पक्ष मजबूत करा. त्यानंतर गरज वाटल्यास हा मतदारसंघही राष्ट्रवादीकडे घेता येईल. सध्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
सध्याचे राजकीय वातावरण पाहता वेळेआधीच कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे एकनाथ खडसे यांनी देखील सांगितले. सध्या शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र, हे सरकार कधीही पडू शकते असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. सत्ताधारी मात्र सरकारला कोणतीही भीती नसल्याचे म्हणत असतात. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सद्याचे राजकीय वातावरण अस्थिर असल्याचे मान्य केल्यास खरेच निवडणुका जाहीर होतील का, हा महत्वाचा प्रश्न. – यावर आता सत्ताधारी गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
