आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस कोरोना बाधित. वर्दीची जबाबदारी पण कुटुंब येतं अडचणी…
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्य पोलीस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत.विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बांधित झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे.शुक्रवारी राज्य पोलीस दलातील २० अधिकारी, १६० अंमलदार बाधित झाले.त्यापैकी १८ जणांनी पहिली तर २६ जणांनी दुसरी लस घेतली होती.
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यातील अंमलदार संदीप तावडे यांचा शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला.त्यांनी दुसरी लस मार्चमध्ये घेतली होती.मुंबई पोलीस दलात ७५ टक्के मनुष्यबळाने लशीची पहिली मात्र घेतली असून दुसरी मात्र घेतलेल्यांचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांवर आहे.राज्य पोलीस दलात आतापर्यंत ४२ हजार १०६ पोलीस बाधित झाले.त्यापैकी ३८ हजार २८६ जणांनी कोरोनावर मात केली.
४३२ जणांचा मृत्यू झाला.तर ३ हजार ३८८ जण सध्या उपचार घेत आहेत. उपचार केंद्रे पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्रांची तजवीज केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी दिली.सध्या कलिना येथे सुमारे २५० खाटांचे उपचार केंद्र सुरू आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक शहराच्या पाच प्रादेशिक विभागांत स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्याच्यादृष्टीने तयारी सुरू आहे.पाचही विभागांमध्ये खासगी, शासकीय इमारती उपचार केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.केंद्रांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा, डॉक्टरांसह आरोग्य सेवकांचे मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे.