त्या अपहरण झालेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी पन्नास हजाराचे बक्षीस केले जाहीर
मंगळवेढा दि.२४/संचारवृतसेवा
मंगळवेढा शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातून अपहरण झालेला बालक शोधण्यासाठी पोलिस प्रशासन अमावस्येच्या काळरात्री डोळयात तेल घालून शोधकार्य करूनही तो न सापडल्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठणार्या पोलिसांच्या पदरी अखेर निराशा पडल्याचे चित्र आहे. दरम्यान पोलिसांनी खचून न जाता गुरूवार रोजी माण नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने सायं.4 वाजेपर्यंत शोध घेतला. पोलिस प्रशासनाने अखेर त्या मुलाच्या शोधासाठी 50 हजाराचे बक्षीसही जाहीर केले आहे.
मंगळवेढा शहरातील एम.आय.डी.सी.परिसरातून रणजितकुमार साहु (वय 4 वर्ष, राज्य-छत्तीसगड) या बालकाला दि.18 रोजी सायं.6 वाजता अज्ञात व्यक्तीने पळवून नेण्याचा प्रकार घडला असून याची नोंदही पोलिसात झाली आहे. घटना घडल्यापासून पोलिस त्या मुलाचा रात्रंदिवस शोध घेत आहेत. बुधवारी अमावस्या असल्यामुळे पोलिस प्रशासन रात्रभर डोळयात तेल घालून भिमा नदीकाठ धर्मगाव, देगाव, घरनिकी, मरवडे, माचणूर, ब्रह्मपुरी, बठाण, सिद्धापूर या परिसरात व मंगळवेढा शहरात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत शोध घेत होते. दरम्यान मंगळवेढा शहरात पंढरपूर बायपास येथे नाकाबंदी करून रात्रभर वाहने चेक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस निरीक्षक हिंमतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजितकुमार माने, पोलिस हवलदार महेश कोळी, दत्तात्रय येलपले, ईश्वर दुधाळ, पोलिस अंमलदार संतोष चव्हाण यांच्यासह पोलिस ठाण्यातील कर्मचारी यामध्ये शोध पथकात सहभागी झाले होते. माचणूर येथे येताळबाबा जवळ मागील दोन वर्षापुर्वी ज्या ठिकाणी लहान मुलाचा बळी दिला गेला. त्याठिकाणी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील ह्या डोळयात तेल घालून अक्षरशः त्या काळरात्रीवर करडी नजर ठेवून होत्या. पोलिस कर्मचार्याबरोबर प्रत्येक गावचे पोलिस पाटीलही या शोधामध्ये सहभागी झाले होते. एवढे करूनही त्या मुलाचा शोध लागत नसल्याने गुरूवारी पंढरपूर येथील छोटया बोटी आणून माण नदी पात्रात दुपारी 1 ते सायं.4 पर्यंत शोध घेतला. मात्र ते बालक मिळून आले नाही. पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी छत्तीसगड येथील पोलिस निरीक्षक व आमदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची माहिती देवून त्या परिसरात बालक निदर्शनास आल्यास कळवण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासन चारही बाजूने तपास करीत असताना ही यामध्ये यश येत नसल्याने पोलिस प्रशासनाने त्या मुलाचा थांगपत्ता सांगणार्याचे नाव गुपीत ठेवून रोख पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
कोट –
दि.18 रोजी चार वर्षीय मुलगा बेपत्ता झाला असून याचा शोध घेण्यासाठी ड्रोन, श्वान पथकची मदत घेण्यात आली. तसेच परिसरातील पडकी घरे, नदी, विहिरी, तलाव या द्वारे शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. यापुढील पर्याय म्हणून या मुलाची माहिती देणार्यास पन्नास हजाराचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणार्याच्या नावाची गोपनीयता राखली जाईल.
- रणजिकुमार माने, पोलिस निरीक्षक,मंगळवेढा
फोटो ओळी – माण नदी पात्रात छोटया बोटीच्या माध्यमातून शोध कार्य घेताना टिपलेले छायाचित्र.(छाया शिवाजी पुजारी,मंगळवेढा)